वेंगुर्ला /-
वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम केलेले असल्यामुळे शासनाकडुन वेळोवेळी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असून स्वच्छतेबाबतीत आपली वेगळी ओळख निर्माण करुन स्वच्छतेचा एक आदर्श घालून दिलेला आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेने ODF++ हागणदारी मुक्त पुरस्कार, 3 स्टार मानांकीत कचरा मुक्त शहर पुरस्कार, स्वच्छ शहर पुरस्कार, कोकण विभागात प्रथम व नगरपरिषद स्वच्छ स्वर्हेक्षण 2020 अंतर्गत देशात 15 वा क्रमांक प्राप्त झालेला आहे.शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 यांची अंमलबजावणी सर्व नगरपरिषदांना बंधनकारक केलेली आहे. त्याबाबतची पुर्तता वेंगुर्ला शहराने सन 2017 मध्ये पुर्ण केलेली आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार 100 टक्के वर्गीकृत कचरा संकलित करणे व त्याची विल्हेवाट लावणे अशी संज्ञा असून वेंगुर्ला नगरपरिषदेकडून याप्रमाणे पुर्तता केली जात आहे. तसेच वरील नियमानुसार प्रक्रिया न करता येणारा कचरा वैज्ञानिक पध्दतीने भू – भराव (Sanitary Landfill) करणे गरजेचे आहे. परंतु वेंगुर्ला नगरपरिषदेने शुन्य कचरा व्यवस्थापन मॉडेल विकसित केलेले आहे. त्यानुसार वेंगुर्ला शहरात जमा होणा-या 100 टक्के कच-याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे भू- भरावासाठी कोणत्याही प्रकारचा कचरा शिल्लक रहात नाही. म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदेला भू – भराव (Sanitary Landfill Site) निर्माण करण्याची गरज नाही. यानुसार शासनाने वेंगुर्ला नगरपरिषदेकडून या प्रकारची माहीती वेळोवेळी मेलव्दारे व व्हिडीओ कान्फरन्सींगव्दारे घेऊन त्या त्या वेळी मान्यता दिलेली असून त्याबाबत अहवाल शासनास सादर केलेला आहे. असे असतानाही वेंगुर्ला नगरपरिषदेचे नाव या यादीत येण्याचे कारण अद्याप अनुत्तरीत आहे.वेंगुर्ला नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापन 2016 मधील नियमांची पुर्तता केलेली असतानाही शासनाकडून पुर्तता न करण्या-या नगरपरिषदेच्या यादीतून नाव कमी करण्याची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे सदरच्या यादीत पुर्तता झालेली असतानाही वेंगुर्ला नगरपरिषदेचे नांव विनाकारण घालण्यात आलेले आहे. त्यामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ प्रतिमेस डाग लावण्याचा प्रयत्न होत आहे.अशाप्रकारे शासनास व पर्यावरणास अपेक्षित असे शुन्य कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविले त्याबद्दल नगरपरिषेकडून कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता दंड ठोठावणे म्हणजे स्वच्छतेच्या कामामध्ये निरुत्साह निर्माण करण्यासारखे आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शुन्य कचरा व्यवस्थापन या ठिकाणी देश – विदेशी नागरीक व अभ्यासू व्यक्ती भेट देत असतात,असे वेंगुर्ले नगरपरिषदेने प्रसिद्धीस दिले आहे.