कुडाळ /-
२६ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड विमानतळ सुरू करण्याबाबत जवळपास सर्व तयारी पुर्ण होत आली असुन नागरी विमान उड्डाण संचालक जनरल ( डीजीसीए ) दिल्लीची समिती 10 जानेवारीला येईल व दि. 20 जानेवारी रोजी परवानगी मिळेल व त्यानंतरच दुसर्या दिवशी विमान तिकीट बुकिंग सुरू होईल. तसेच एलायन्स विमान वाहतूक कंपनीच्या वतीने मुंबई ते सिंधुदुर्ग अशी वाहतुक सुरू होईल तर त्यानंतर इंडीगोच्या माध्यमातून मुंबई, दिल्ली व इतर ठिकाणी प्रवासी वाहतुक प्रस्तावित असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी विमानतळ येथे झालेल्या बैठकीत मीडियाशी बोलताना दिली आहे.
विमानतळ सुरू करण्या संदर्भात खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विमानतळ येथे बैठक घेण्यात आली. यावेळी आयआरबीचे राजेश लोणकर, माजी जि. अध्यक्ष विकास कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, विधान सभा मतदार संघ अध्यक्ष शैलेश परब माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, सचिन देसाई, पावशी सरपंच बाळा कोरगावकर,चिपी सरपंच गणेश तारी, विजय घोलेकर, वीज वितरण विभागाचे, बीएसएनएल विभागाचे देशमुख तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत राजेश लोणकर यांनी सांगितले की, इंटरनेट कनेक्टीव्हिटी साठी बीएसएनएलला पहीले 21 लाख रूपये मंजुर होते मात्र आता आता 24 लाख अंदाजित रक्कम आहे. गुरूवार पर्यंत हे 24 लाख रूपये बीएसएनएल विभागाकडे जमा केले जातील. मात्र कनेक्टीव्हिटी कधीही बंद होता कामा नये.यावेळी देशमुख यांनी सांगितले की, वेंगुर्ला म्हापण, परूळे मार्गे कनेक्शन देण्याबाबत ची सर्व तयारी पुर्ण झाली असुन पण पैसे भरले नव्हते तसेच आता त्यात राउटर आवश्यक असल्याने हे काम काम जरा उशीरा सुरू झाले. मात्र येथील कनेक्टीव्हिटी मध्ये खंड पडणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी वीजवितरण विभागाच्या अधिकार्यानी सांगितले की, 11 केव्ही वीज पुरवठा करण्यात आला आहे. आवश्यक असलेला 33 केव्ही वीज पुरवठा सुरू करण्यात येईल.
यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले की, जानेवारी त हा विमानतळ सुरू करायचाच आहे. दि. 4 जानेवारी रोजी एलायन्स विमान कंपनीची समिती तर दि.10 जानेवारी पर्यंत डीजीसीए समिती यायची आहे त्यामुळे सर्व तयारी पुर्ण करा, 20 तारीख पर्यंत येथील विमानतळाच्या परवानगी आणायचीच असुन दि. 26 जानेवारी रोजी या विमानतळाचे उद्घाटन होईल. इंडीगो कंपनी ही विमान वाहतूक सुरू करण्यासाठी सहमत आहे ते मुंबई दिल्ली अशी वाहतुक करतील.रात्रीचा ही विमानतळ सुरू राहण्यासाठी 33 केव्ही वीज पुरवठा आवश्यक आहे. कुभांरमाठ येथुन 4 किमी अंतर अंडरग्राऊंड केबलसाठी लागणारा खर्चात बाबत योग्य ती तरतुद करण्यात येईल त्यासाठी प्रस्ताव पाठवा असेही त्यांनी सांगितले.
येत्या चार दिवसात कुडाळ वरून पाणी पुरवठा पाईप लाईन चे काम सुरू होवुन हे काम एका महीन्यात पुर्ण होईल.
यावेळी पिंगुळी- पाट ते चिपी कडे येणार्या रस्ता सुस्थितीत होणे गरजेचे आहे असे सुनील म्हापणकर यांनी सांगितले. त्यावेळी या बाबत तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात यावी अशा सुचना राऊत यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यानां केल्या.
विमानतळ सुरक्षे संदर्भात पोलिस महासंचालक यांचेकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला लवकर मंजुरी द्यावी या बाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी त्यांनी मोबाईल व्दारा चर्चा केली.यावेळी खासदार राऊत व आम. नाईक यांनी एटीसी टाॅवर, प्रवासी, इमारत, विमान सिग्नल यंत्रणा तसेच इतर सेवा सुविधांची पाहणी केली.