अणसुर येथे शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकला बिबट्या..

अणसुर येथे शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकला बिबट्या..

वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने त्याला वाचवले

वेंगुर्ला/-

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथे काल विहिरीत बिबट्या मिळाला होता. तर आज मंगळवारी अणसुर येथील संजय गावडे यांच्या बागेमध्ये शिकारीसाठी लावलेल्या फासकी मध्ये बिबट्या अडकलेल्या स्थितीत आढळला. वनविभागाने वेळेत घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्या बिबट्याला पिंजर्‍यात पकडले, त्यामुळे तो वाचला आहे. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
वेंगुर्ले अणसुर घाटी माथ्यावरील संजय गावडे यांच्या बागेत बिबट्या फासकीत अडकला होता.आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संजय गावडे बागेत गेले असता त्यांच्या पाच फुट अंतरावर बिबट्याने डरकाळी फोडली. मात्र बिबट्या फासकी त अडकला असल्याने गावडे धोक्यातून वाचले.
तात्काळ त्यांनी पोलीस पाटील बाबु गावडे व मठ येथील वनविभाग कार्यालयात याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी मठ वनपाल अण्णा चव्हाण,कुडाळ वनक्षेत्रपाल शिंदे,कडावल वनक्षेत्रपाल चिरमे,नेरूर वनपाल कोळेकर,मठ वनरक्षक व्ही.एस.नरळे, तुळस वनरक्षक सावळा कांबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या बिबट्याला सुखरूपपणे पिंजऱ्यात पकडले. यावेळी संजय गावडे यांच्यासह पोलिस पाटील तसेच ग्रामस्थ आनंद गावडे, राजेश गावडे, परशुराम तलवार, अनिल नवार, सुनील गावडे, राकेश गावडे आदी सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..