वैभववाडी:
३१ डिसेंबर हा इंग्रजी महिन्याचा शेवटचा दिवस आपल्याकडे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. ३१ डिसेंबरच्या पुर्व संध्येला ‘द दारुचा नव्हे, द दुधाचा’ हा उपक्रम राबवून नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र अंनिसं यांच्यावतीने करण्यात येत आहे.
आज व्यसन फॕशन म्हणून केले जाते तसेच त्याला प्रतिष्ठा दिली जातेय. अनेक नवयुवकांची याच दिवशी व्यसन करण्याची सुरुवात होते. ३१ डिसेंबरला दारू पिणा-यांचे प्रमाण हळूहळू वाढताना निदर्शनास येत आहे. यासाठी नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र अंनिस गेल्या अनेक वर्षापासून या दिवशी व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत. १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ ही मोहीम राबवीत आहे. यंदा कोव्हिड-१९ च्या महामारीमुळे यामध्ये काही प्रमाणात मर्यादा आलेल्या आहेत. याची जाणीव आम्हा सर्वांना आहेत तरीही सर्व नियम पाळून ज्यांना शक्य आहे त्यांनी व तरुण मंडळानी अप्रत्यक्षपणे ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३० डिसेंबर २०२० रोजी ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा’ हा उपक्रम स्थानिक पातळीवर घडवून जनजागृती घडवून आणावी. नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊ नव्हे तर शुद्धीत राहून साजरे करुया असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष व व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचचे निमंत्रक श्री.अविनाश पाटील, नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वर्षा विध्या विलास व समिती सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले आहे.