वेंगुर्ला /-

गतवर्षी ११ जून २०१९ रोजी झालेल्या ” वायु ” चक्रिवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडी तील आठ मच्छिमारांची जाळी वाहुन जाऊन हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मत्स्यविभागाचे अधिकारी व महसूल चे अधिकारी यांनी नवाबाग वाडी मध्ये जाऊन पंचनामा करून नुकसानीची पंचयादी केली होती.तसेच नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला होता. परंतु अद्याप त्यांना शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही .परंतु त्यानंतर झालेल्या ” कायर ” चक्रिवादळाची नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली. परंतु त्यापूर्वी झालेल्या ” वायु ” वादळाची नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली नाही.ज्यावेळी ” वायु ” चक्रिवादळामुळे मच्छिमारांची जाळी वाहुन गेली होती त्यावेळी तात्कालिन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी नवाबाग वाडी मध्ये येऊन पहाणी करुन शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देईन असे आश्वासन दिले होते. परंतु दीड वर्ष होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने नाईलाजाने २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी , वेंगुर्ले जोशी यांना दिले आहे.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, नवाबाग बुथप्रमुख प्रकाश मोटे, इच्छाराम मालवणकर, शामसुंदर कोळंबकर, दत्ताराम कोळंबकर, मुकुंद खडपकर, देवेंद्र तांडेल इत्यादी नुकसानग्रस्त मच्छिमार उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती माहितीसाठी तहसीलदार – वेंगुर्ले व पोलिस निरीक्षक – वेंगुर्ले यांना देण्यात आल्या आहेत.दरम्यान मच्छिमार बांधवाच्या उपोषणास भाजपा वेंगुर्ले चा पाठींबा असल्याचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page