मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी गिरीश महाजन यांनी धमकावल्याचा आरोप
भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी महाजन यांनी धमकावल्याचा आरोप करत गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Adv. विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ८ डिसेंबर रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात गिरीष महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१८ मध्ये घडलेल्या घटनेची तीन वर्षांनी फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव मधील मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये भोईटे गटाकडून Adv. विजय पाटील यांना पुण्यात बोलवून धमकावले होते. ही संस्था गिरीश महाजनांना हवी आहे. त्यासाठी ते १ कोटी द्यायला तयार आहेत, असे भोईटे गटाने Adv. विजय पाटील यांना सांगितले. मात्र, Adv. विजय पाटील यांनी नकार दिल्यानंतर चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली, असे Adv. विजय पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?
मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी तानाजी भोईटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने जानेवारी २०१८ मध्ये पुण्यात बोलावून घेतले होते. Adv. विजय पाटील यांनी मोठे बंधु नरेंद्र पाटील आणि महेश आनंदा पाटील यांच्यासह कारने पुण्याला गेले. तानाजी भोईटे यांनी पाटील यांना कोथरुड परिसरातील हॉटेल किमया येथे बोलावले. या ठीकाणी तानाजी भोईटे, निलेश भोईट, शिवाजी भोईटे, विरेंद्र भोईटे, रामेश्वर नाईक हे थांबलेले होते. यावेळी तानाजी भोईटे यांनी ही संस्था गिरीष भाऊला हवी आहे, भाऊ एक कोटी रुपये देण्यास तयार आहेत’ असा निरोप दिला. मात्र, आम्ही त्यांना नकार दिला. नंतर रामेश्वर नाईक याने स्वत:च्या मोबाईलवरुन गिरीश महाजन यांना व्हिडीओ कॉल केला. ‘तु सर्व संचालकांचे राजीमाने घेऊन ही संस्था निलेश भोईटेच्या ताब्यात देऊन टाक, तुझा विषय संपवुन टाक’ असे महाजन यांनी व्हिडीओ कॉलवर Adv. पाटील यांना सांगीतले. मात्र, पाटील यांनी नकार दिला. त्यानंतर भोईटे गटाने चाकूचा धाक दाखवला, असे Adv. विजय पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, गिरीश महाजन आणि भोईटे गटाविरोधात गुन्हा दाखल झाला असून तो गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page