धक्कादायक प्रकाराची सखोल चौकशी करा…
मधुरा चोपडेकर, सुनील घाडीगावकर यांची मागणी….
मालवण /
देवबाग गावात अस्तित्वात नसलेल्या सुमारे पंधरा इमारतींना ग्रामपंचायतीने घर क्रमांक दिला असल्याची धक्कादायक माहिती पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली. ही गंभीर बाबअसून यात दोषी असलेल्या ग्रामसेवकाची सखोल चौकशी करून कारवाई करा अशी मागणी चोपडेकर तसेच पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी यावेळी केली.
दरम्यान उद्या देवबाग येथे जात प्रत्यक्षात याची सभापती, सदस्य व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर, सदस्य अशोक बागवे, विनोद आळवे, मनीषा वराडकर, सोनाली कोदे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर, छाया परब यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
देवबाग गावात अस्तित्वात नसलेल्या पंधरा इमारतींना ग्रामपंचायतीने घर क्रमांक दिला आहे. याबाबतची तक्रार रमेश कद्रेकर यांनी केली आहे. त्यावर पंचायत समिती प्रशासनाने कोणती कारवाई केली असा प्रश्न मधुरा चोपडेकर यांनी केला. यावर चौकशी केली जाईल असे प्रशासनाने सांगितले. यावर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी. डी. जाधव हे हा विषय गुंडाळून ठेवणार असल्याने याची तत्काळ सखोल चौकशी व्हायला हवी. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत संबंधित ग्रामसेवकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत अस्तित्वात नसलेल्या इमारतींना घर क्रमांक देणे ही गंभीर बाब असून संबंधित ग्रामसेवकाची सखोल चौकशी करून कारवाई करा अशी मागणी श्री. घाडीगावकर यांनी केली. त्यानु उद्या सकाळी देवबाग येथे जात वस्तुस्थितीची पाहणी करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.