मालवण /-
कोरोना बाधित रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि नीलक्रांती संस्थेने जिल्हा प्रशासनाकडे कांदळगाव येथील नीलक्रांती संस्थेच्या मल्टिपर्पज सेंटर मध्ये समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र (Dedicated Covid Health Centre-DCHC)” सुरु करण्याची परवानगी मागितली होती. जिल्हा व तालुका प्रशासनाने याची तातडीने दखल घेत या केंद्रास मान्यता दिली आहे. येत्या १० तारखेला या कोव्हीड आरोग्य केंद्राचे लोकार्पण जिल्हाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या आरोग्य केंद्रासाठी विशेष पुढाकार घेतला. सर्व कायदेशीर प्रक्रिया, प्रत्यक्ष पाहणी व सूचना करून या केंद्रास प्रशासनाने परवानगी दिली आहे.कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेली जिल्हा रुग्णालय मधील वैद्यकिय टीम बाधित होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण आला आहे. जिल्ह्यातील वैद्यकिय व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलिस तसेच कोव्हीड योद्धा म्हणून गेली कित्येक महिने कार्यरत असलेले समाजातील घटक कोरोना बाधित होत आहेत. अशा रुग्णांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी या केंद्राची मागणी करण्यात आली.
कोकणामध्ये ग्रामीण भागात सुरू होणारे हे पहिले समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र (Dedicated Covid Health Centre-DCHC)” अाहे. या केंद्रामध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णावर सरकारी दरपत्रकानुसार उपचार होणार आहेत. याठिकाणी इतर आवश्यक सुविधा बरोबरच हाय फ्लो न्यासल ऑक्सीजन बरोबरच इनवॅसिव व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.जिल्ह्यातील पहिले एम.डी. आणि प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक रेडकर यांच्या मार्गर्शनाखाली मेडीसिन आणि प्रत्यक्ष सेवेद्वारे तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. सेवा देणाऱ्या प्यारा मेडिकल कर्मचारी वर्गाला विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांचा वैद्यकिय विमा आहे त्यांना पण याचा लाभ मिळणार आहे.
या आधी धारगल, गोवा येथील रेडकर हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. संस्थेचे डॉ. सागर रेडकर टेली मेडीसिनद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच कोरोना बाधित झालेल्या दोन्ही संस्थेच्या सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना बाधित होऊन करोना मुक्त झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सुरू केलेले राज्यातील पहिले “समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र (Dedicated Covid Health Centre-DCHC)”आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या होते या कोव्हीड आरोग्य केंद्राचे लोकार्पण होणार आहे. जिल्ह्यात हे केंद्र सुरू होणार असल्याने कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे. तरी कोरोना रुग्णांनी या सेवेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास रेडकर हॉस्पिटल (०२३६५/२५२११५) , मोबा – ७५८८५४४७०० येथे संपर्क साधावा असे आवाहनही श्री. तोरसकर यांनी केले आहे.