नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती..

मालवण / –
मालवण शहरात विनाममास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची धडक कारवाई सुरू आहे. १ हजार ७५५ व्यक्तींवर कारवाई करत तब्बल ३ लाख ६७ हजारांचा दंड १२ डिसेंबर पर्यत वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.

दरम्यान, जास्तीत जास्त दंड वसुली हे पालिकेचे उद्दिष्ट नसून सर्वांनी मास्क वापराची प्रभावी अंमलबजावणी करावी हाच आपला प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे मास्क वापराबाबत जनजागृतीही केली जात असून ज्यांच्याकडे मास्क नाहीत त्यांना पालिकेकडून मास्कही दिले जात आहे. कोरोना नियत्रणात आला तरीही आता खरा कसोटीचा काळ आहे. सिंधुदुर्ग मधे पुन्हा रुग्ण सापडू लागले आहेत. नागरिकांनी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. नजिक येणारा ख्रिसमस व नवीन वर्षच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण वाढणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. अन्यथा पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे काळजी घेणे महत्वाचे
असल्याचे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.

कोरोना संक्रमण पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन जाहीर झाले. त्यांनंतर केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना खबरदारी नियमांची अंमलबजावणी मालवण शहारात प्रभावीपणे करण्यात आली. पोलीस व महसूल प्रशासनासोबत मालवण पालिका प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नातून व नागरिकांच्या सहकार्यातून मालवण शहर सुरवातीचे चार महिने कोरोनामुक्त राहिले. मात्र त्यानंतर हळूहळू शहरात कोरोनाचा प्रसार वाढला मात्र मास्क सक्ती व सोशल डिस्टन्स यांच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे कोरोनवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात पालिका कर्मचारी यांच्या सोबत पोलीस प्रशासनाचे महत्वाचे योगदान आहे.

एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत (१२ डिसेंबर) शहरात विनामास्क १ हजार ७५५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत ३ लाख ६७ हजार २०० दंड वसूल करण्यात आला आहे. कमीत कमी १०० रुपये स्वरूपातील दंड पावती सर्वाधिक व्यक्तींवर करण्यात आली आहे.

मालवण शहराचे प्रमुख प्रवेश मार्ग असलेल्या भरड नाका येथे कारवाईसाठी पालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी तैनात असतात. त्यासोबत बाजरपेठ, रॉक गार्डन, समुद्रकिनारा या मार्गावर फेरी असते. अपुऱ्या कर्मचारी संख्येचा विचार करता पालिकेला सगळीकडे कर्मचारी तैनात करणे शक्य नाही. त्याचा विचार करता व्यपारी वर्ग, अन्य छोटे व्यवसाईक, हॉटेल व्यवसाईक, वाहनचालक यांनीही विनामास्क फिरणाऱ्या पर्यटक अथवा नागरिकांना मास्क लावणेबाबत आवाहन करावे. पालिकेकडून जनजागृती, फलकद्वारे जागृती सुरू आहे. त्यासोबत आपल्या सर्वांचेही जनजागृतीत योगदान अपेक्षित आहे. आपल्या सर्व मालवण वासीयांच्या सहकार्याने, कोरोना खबरदारी नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मालवण शहर काही दिवसांपूर्वी कोरोना मुक्त झालो होते. मात्र शनिवारी शहरात नव्याने ३ रुग्ण सापडून आले. मात्र आपण घेत असलेली काळजी आदर्शवत अशीच असून यापुढेही मास्क, सोशल डिस्टन्स, हात स्वच्छता याचा प्रभावी वापर करून मालवण शहर कोरोनामुक्त करूया.असे आवाहनही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page