लालबाग सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील आतापर्यंत तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला
लालबाग, साराभाई इमारतीत गॅस सिलिंडर दुर्घटनेतील आणखीन एक गंभीर जखमी विनायक शिंदे (५७) यांचे उपचारादरम्यान केईएम रूग्णालयात निधन झाले. त्यामुळे आता लालबाग दुर्घटनेतील मृतांची संख्या ६वर गेली आहे. तर आतापर्यंत ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला असून उर्वरित ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. यामध्ये, मसीना रुग्णालयातील ४ तर केईएम रुग्णालयातील ३ जणांचा समावेश आहे.
लालबाग, साराभाई इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या घरात मुलीच्या लग्नकार्याप्रसंगी ६ डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम असताना सकाळच्या सुमारास गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला होता. त्यामुळे १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी सुशीला बांगरे (६२), करीम (४५), मंगेश राणे (६१), ज्ञानदेव सावंत (८५) आणि महेश मुणगे (५६) यांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. तर आणखीन एक गंभीर जखमी विनायक शिंदे (५७) यांचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ झाली आहे.
सध्या, केईएम रुग्णालयात ३ जण तर मसीना रुग्णालयात ४ जण उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. तीन जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे.