भिवंडी तालुक्यातील पडघा येथे गुरुवारी एका महिलेसह तिच्या तीन मुलांचे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. रंजना बांगारे (३०), दर्शना (१२), रोहित (९) आणि रोहिणी बांगारे (४) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा मृत्यू ५० दिवसांपूर्वीच झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, रंजना बांगारे हिच्या भावाने याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात रंजनाचा पती श्रीपत आणि त्यांची दुसरी पत्नी सविता यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गर्भाशयाच्या आजारामुळे रंजना हिच्यावर काही महिन्यांपूर्वी उपचार झाले होते. तरीही रंजना हिला श्रीपत आणि त्याची दुसरी पत्नी सविता जास्त काम करण्यास सांगत असत. या त्रासाला कंटाळून तिने मुलांसह आत्महत्या केल्याचे रंजनाच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार श्रीपत आणि त्याची दुसरी पत्नी सविता यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पडघा येथील उंबरखांड परिसरात राहणाऱ्या रंजना आपल्या तीन मुलांसह २० ऑक्टोबरपासून बेपत्ता होत्या. शेतावर जाते, असे सांगून रंजना मुलांसह घराबाहेर पडल्या होत्या. मात्र उशिरापर्यंत त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे पती श्रीपत बांगारे यांनी २१ ऑक्टोबरला पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.
श्रीपत यांचा भाऊ संतोष गुरुवारी दुपारी गावाजवळील जंगलात लाकूडफाटा जमवण्यासाठी गेला असता त्याला दरुगधी आली. दरुगधी कोठून येते हे शोधत असताना कुजलेल्या अवस्थेतील चार मृतदेह त्यांना आढळले. त्यापैकी दोन मृतदेह झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत होते, तर दोन मृतदेहांचे सांगाडे जमिनीवर गळून पडलेले होते. मृतदेहांवरील कपडे पाहून त्यांनी घराकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पडघा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
पत्नी आणि मुलांच्या मृत्यूची माहिती समजताच श्रीपत आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले.