माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांची माहिती..
कुडाळ /-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून गावठी आठवडा बाजार जानेवारी महीन्यात सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवु असे आश्वासन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी कुडाळ येथील गावठी आठवडा बाजारात विविध स्थानिक ऊत्पादने, भाज्या, फळे, भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना दिले.
कोरोना मुळे असलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वच आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व व्यवहार बाजारपेठा सुरू करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील आठवडा बाजार सुरू करण्यात यावा अशी मागणी कुडाळातील गावठी आठवडा बाजारातील व्यावसायिकांनी पंचायत समिती येथे सभापती नूतन आहीर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांची भेट घेत केली. यावेळी भाजपाच्या महीला मोर्चा प्रमुख संध्या तेरसे, पावशीचे माजी सरपंच पप्या तवटे उपस्थित होते.
यावेळी रणजित देसाई यांनी सांगितले की, जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजारामुळे जिल्ह्यातील अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. जिल्ह्यातील स्थानिक ऊत्पादने, भाज्या, फळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना मिळू लागल्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लाॅकडाऊन मुळे गावठी बाजार बंद करण्यात आले. आता सर्व व्यवहार सुरळीत झाले असले तरीही सुरक्षेच्यादृष्टीने गावठी आठवडा बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने ठेवलेल्या नियमांचे पालन करित जानेवारी महीन्यात हा आठवडा बाजार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.