ब्रिटननंतर आता जर्मनीनेदेखील करोना लसीकरणाचे संकेत दिले आहेत. ब्रिटनमध्ये करोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर, जर्मनीमध्ये जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे.
‘या’ देशात जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू होणार
बर्लिन: अनेक युरोपीयन देश करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. तर, दुसरीकडे ब्रिटनने करोना लसीकरणास सुरुवात केली आहे. आता जर्मनीनेदेखील आपल्या देशातील लसीकरण मोहिमेबाबत संकेत दिले आहेत. जर्मनीत जानेवारीत करोनाविरोधीत लसीकरण सुरू होईल, अशी माहिती चॅन्सेलर अॅँजेला मर्केल यांचे चीफ ऑफ स्टाफ हेल्ज ब्राउन यांनी सोमवारी दिली. त्यादृष्टीने जर्मनीत आता तयारी सुरू करण्यात आली आहे.
हेल्ज ब्राउन यांनी सांगितले की, देशभर विशेष लसीकरण केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार ठेवण्यात आले आहे. ‘देशात करोनाची रुग्णसंख्या सध्या स्थिर आहे. देशात दोन नोव्हेंबरपासून लॉकडाउन करण्यात आल्याने स्थिती नियंत्रणात आहे. बाधितांची संख्या घटलेली नाही, त्यामुळे काळजी घेण्याची सवय नागरिकांनी सोडू नये, असे ब्राउन यांनी स्पष्ट केले आहे. जर्मनीत गेल्या २४ तासांत १२,३३२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी लशीबाबत मोठे वक्तव्य केले होते. नाताळापूर्वीच लस येणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली. लशीमुळे करोनाचे संकट पूर्णपणे टळणार नसले तरी आशेचा एक किरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लोकांना करोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासह आरोग्य व्यवस्था सुरळीत सुरू राहील याकडेही ते लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य, अर्थव्यवस्था, सोशल डिस्टेंसिग, शिक्षण आदी सर्व बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जर्मनीत करोनाचा थैमान सुरू आहे. दोन नोव्हेंबर रोजी लॉकडाउन करण्यात आले होते. त्यानंतर रेस्टोरंट्स, बार, स्पोर्ट्स आणि मनोरंजनाची सार्वजनिक स्थळे बंद करण्यात आली. तर, शाळा, दुकाने आणि हेअर सलून सुरू ठेवण्यात आले होते. जर्मनीत करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत १५ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनाबाधितांचा आकडा १० लाखांच्या घरात पोहचला आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी त्याविरोधात आंदोलन केले.
कॅलिफोर्नियात निर्बंध
कॅलिफोर्नियात पुन्हा निर्बंध जाहीर झाल्याने नागरिकांना घरातच राहावे लागणार आहे. संसर्ग रोखण्यासाठी रेस्टॉरंट, सलून, किरकोळ दुकाने बंद ठेवले जाणार आहेत. त्याशिवाय, गर्दी करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. अतिदक्षता विभागाची क्षमता संपल्याने प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
चीनमध्ये १५ नवे रुग्ण
चीनच्या ईशान्य सीमेवरील मंझौली शहरात प्रशासनाने चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण केला आहे. परिसरात सोमवारी तीन नवे रुग्ण सापडल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शहरात गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात २,००,७४५ चाचण्या घेण्यात आल्या. दरम्यान, चीनमध्ये सोमवारी एकूण १५ नवे रुग्ण सापडले.
उत्पादन करणार दुप्पट
चिनी लस कंपनी सिनोव्हॅकने वार्षिक लस उत्पादन दुप्पट करणार असल्याचे म्हटले आहे. वर्षाला साठ कोटी लशींची निर्मिती वर्षअखेरीस सुरू होईल, त्यासाठी ५० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात आल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले. कंपनी सध्या ब्राझिल, टर्की, इंडोनेशिया आदी देशांत लशीच्या वैद्यकीय चाचण्यांचा अखेरचा टप्पा पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत आहे.