भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबरपासून सुरू..

भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबरपासून सुरू..

संस्थानची माहीती;शासकीय नियम पाळून साधेपणाने साजरा होणार…

कणकवली /-

शहरातील परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने यंदा हा उत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवात सर्व धार्मिक विधी होणार आहेत. मात्र महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आज संस्थानतर्फे देण्यात आली. परमहंस भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी आणि जयंती महोत्सव दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जात असे. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कमिटीने पुण्यतिथी महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत समाधीपूजन, काकड आरती, सकाळी ८.३० ते १२.३० सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी भालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठान’ दुपारी १२.३० ते१ आरती, १ ते साय. ७ वा.पर्यंत भजन मंडळांची भजने, सायं. ७ वा. धुपारती, रात्रौ ८ वा. बाबांची दैनंदिन आरती होणार आहे. परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी दिन २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्त पहाटे ५.३० वा. समाधीपूजन, काकड आरती, स.८ ते १०.३० भजने, १०.३० ते १२.३० समाधीस्थानी श्रींची राजोपचार महापूजा, दुपारी १२.३० ते १ आरती, १ ते ५ भजने, सायं. ५ वा. संस्थान परिसरात भाविकांच्या मर्यादीत उपस्थितीत परमहंस भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक, रात्रौ ८ वा. दैनंदिन आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महोत्सवास येणार्‍या भाविकांनी शासकीय नियम व शिस्त पाळणे आवश्यक आहे. संस्थान परिसरात व समाधीस्थानी मास्क लावून शिवाय योग्य अंतर ठेवून दर्शन घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी. कोरोना पार्श्वभूमीवर महाप्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थानच्यावतीने अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..