मालवण /-
सुकळवाड पाताडेवाडी येथील शेतविहिरीत भर दुपारी पडलेल्या रानडुक्कराला जीवदान देण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले.
कृष्णा पाताडे यांच्या जुन्या शेतविहिरीत काल दुपारी विहिरीला कठडा नसल्याने रानडुक्कर पडल्याचे निदर्शनास येताच पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी वनविभागाला याची कल्पना दिली. वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत रानडुक्कर विहिरीत सतत पोहत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने पकडून विश्रांती दिली. वनविभागाचे सारीक शेख यांच्यासह कर्मचारी पिंजऱ्यासह दाखल झाल्यावर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून रानडुक्कराला जीवदान देण्यात यश आले. विहिरीतून वर काढल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानडुक्करास वनविभागाच्या गाडीतून जंगलात नेत नैसर्गिक अधिवासात सोडले. डुक्कराला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.