मालवण /-
तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे अशातच लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसात तालुक्यात लेप्टोस्पायरोसिसचे सहा रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी दिली.
तालुक्यातील काळसे, चिंदर, राठीवडे, असरोंडी, धामापूर व शिरवंडे या गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. सहाही रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांत ज्या गावात लेप्टो रुग्ण सापडले होते ती गावे जोखीम ग्रस्त म्हणून नोंदली जातात. तालुक्यातील अशा २८ गावात गोळ्या वाटप, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ती २८ गावे वगळून अन्य ठिकाणी रुग्ण सापडले. त्या गावातही गोळ्या वाटप करण्यात आले. तापसरीच्या पार्श्वभूमीवर ओवळीये व अन्य गावात सर्वे करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. उंदीर व अन्य प्राण्यांचे मलमूत्र शेतातील पाण्यात मिसळते. शेतीत काम करणाऱ्या व्यक्तीला जखम झाली असल्यास दूषित पाण्याद्वारे जखमेतून लेप्टो मानवी शरीरात प्रवेश करतो. ताप व अन्य लक्षणे दिसून येतात. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा मालवण ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधावा. त्या ठिकाणी लेप्टो टेस्ट किट उपलब्ध आहेत. त्याद्वारे तत्काळ तपासणी करावी. तसेच शेतीत पाण्यात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी अधिक काळजी घ्यावी. असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.