चौके /-
मालवण नेरुरपार मार्गे कुडाळ या रस्त्यावरील काळसे ते कुडाळ दरम्यान सुमारे ८ कि. मी. रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरशः चाळण झाली असून हा रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक बनलेला आहे. जवळपास वर्षभर या रस्त्याची अशी दुर्दशा झालेली आहे. दररोज शेकडो वाहने या मुख्य रस्त्यावरून ये जा करतात खराब रस्त्यामुळे वाहनांचे खूप नुकसान होत आहे आणि १० मिनिटांचे अंतर पार करण्यास ४५ ते ५० मिनिटे लागत आहेत . तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राजकीय पुढारी या रस्त्याच्या डागडुजीकडे मात्र लक्ष देत नाहीत.
अधिकारी तसेच पुढारी हे आलिशान गाड्यांमधून या मार्गावरून ये जा करतात त्यामुळे त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारा त्रास कदाचित जाणवत नसेल पण दुचाकीस्वार, रिक्षाचालक, छोटी वाहने याद्वारे नियमित या मार्गावरून ये जा करणाऱ्यांना मात्र खड्डेमय रस्त्यामुळे रोजच मरण यातना भोगाव्या लागत आहेत. खास करून रिक्षातूत एखाद्या रुग्ण अथवा गरोदर महिलांना रुग्णालयात न्यायचे झाल्यास किती त्रास सहन करावा लागत आहे ते तो रुग्ण अथवा ती महिला आणि रिक्षाचालक यांनाच माहित आहेत. जनतेच्या या त्रासाचे आणि समस्यांचे ना राजकीय पुढाऱ्यांना देणघेण आहे ना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना.
सुमारे १० किलोमीटर चा हा रस्ता सध्या मृत्युचा सापळाच बनला आहे. संपूर्ण मार्गावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी डांबराचा थरच उचकटून गेला आहे. त्याचप्रमाणे नेरुरपार पुलावरही कॉंक्रीट फुटून लोखंडी शिगा वर आलेल्या आहेत. त्या शिगा लागून वाहनांचे टायर फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारंवार अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत आहे . त्यामुळे या रस्त्याची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
मालवण -चौके -नेरुरपार मार्गे कुडाळ या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये जा करत असल्याने या रस्त्याची दरवर्षी दर्जेदार दुरुस्ती अथवा नुतनीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांना जर खरोखरच जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर या रस्त्याच्या दुरुस्तीचा आणि नूतनीकरणाचा प्रश्न तातडीने सोडवावा जेणेकरून या मार्गावरचा प्रवास सुखकर होइल. अशी मागणी या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमधून होत आहे.