कुडाळ /-
कुडाळ शहरात नव्याने सुरु होत असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीच्या नॅचरल गॅस प्रकल्पामुळे शहरवासीयांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असून, अशा प्रकारे नॅचरल गॅस हा पाईप लाईनद्वारे घरोघरी पोहोचणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात घरोघरी नॅचरल गॅस पाईपलाईन जोडणीचे काम सुरु झाले आहे. याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केले. महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. यांच्या मार्फत नॅचरल गॅस पाईप लाईनद्वारे जोडण्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या हस्ते आज कुडाळ येथे करण्यात आला. यावेळी नगरसेवक सचिन काळप, एमएनजीएल कंपनीचे जी. ए. हेड किरण ठुसे, अधिकारी सुदर्शन शिंदे, महेश तुपारे, कॉन्ट्रॅक्टर सुशील कदम, किरण राऊळ, अनिल सावंत उपस्थित होते. देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून तसेच ग्रामीण भागातील सर्वात स्वछ जिल्हा म्हणून सन्मान मिळालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन योजनेत केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने समावेश केला आहे. या योजनेत घरगुती गॅस वापरासोबत हॉटेल व्यावसायिक, छोटे उद्योग व वाहनासाठीही गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठीची नोंदणी सुरु आहे.