कुडाळ /-

कुडाळ प्रांताधिकारी यांची अदलाबदली करून “परमार” प्रकरणा तील कारवाई थांबवू देणार नाही, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक भूमिका घेईल असे मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी सांगितले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुधारणा व रुंदीकरण उपक्रमांतर्गत भूसंपादनाच्या बाबतीत अनेक तक्रारी शासन दप्तरी नोंदित झाल्या आहेत. जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तीन वर्षे होत आली तरी मोबदला रक्कम दिली नाही अशी असंख्य प्रकरणे प्रलंबित असताना, परजिल्ह्यातील एका व्यावसायिकाला अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या अर्थपूर्ण संबंधातून फुकटचे लाखो रुपये देऊन शासन निधी अपहार केल्याचे प्रकरण कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात कारवाईसाठी प्रलंबित आहे. या प्रकरणात भूमिअभिलेख विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी सामील असून ते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मार्फत स्वतःवरील कारवाई टाळण्यासाठी महसूल यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रांत कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे लोकप्रतिनिधी आता मात्र स्वतःची भूमिका जाहीर करत नाहीत त्यामुळे हे सर्व प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अशा पद्धतीने भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाई थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधीच पुढाकार घेत असतील तर यामध्ये नेमके कोणते हित संबंध जोपासले गेले आहेत याचा जनतेचे विचार करण्याची गरज आहे.परमार प्रकरणावरील कारवाई दडपण्यासाठी कुडाळ प्रांत अधिकारी कार्यालयाचे हायवे बाबत भूसंपादनाचे सक्षम प्राधिकारी म्हणून अधिकार हे काढून घेऊन कणकवली प्रांत कार्यालयाला देण्यात आले आहेत ते पाहता अशी अधिकाऱ्यांची अदला बदली करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सत्ताधारी लोकप्रतिनिधी करत असून महसूल यंत्रणेला वेठीस
धरण्याचे काम करत आहेत.अशा अदलाबदलीने परमार प्रकरणातील कारवाई थांबणार नाही किंबहुना वेळ प्रसंगी मनसे अशा भ्रष्ट प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी मीडियाशी बोलताना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page