कणकवली /-

वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करून महावितरण व ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवून कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी केवळ पाच जणांचे शिष्टमंडळ जाईल अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतल्याने, पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. अखेर महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी गेटवर येऊन भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. १० डिसेंबरला या समस्येवर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र सरकारने वीज बिल माफ करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र वीज मंत्र्यांनी वीज बिले माफ होणार नाहीत असे जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पाटीर्ने जिल्हाभरात मोर्चा, निदर्शने सुरु केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कणकवली वीज वितरण कार्यकारी अभियंता कार्यालयावर तालुका भाजपच्यावतीने आजचे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारचा निषेध असो, वीज दरवाढ रद्द झालीच पाहिजे, महावितरण हाय हाय, पोलिसांच्या आडून दादागिरी करणाºया सरकारचा निषेध असो अशा जोरदार घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या.
पोलिसांनी गेटवर अडवताच शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी रस्त्यात ठिय्या मारत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, बबलू सावंत, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, माजी उपसभापती महेश गुरव, विजय चिंदरकर,युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, विजय इंगळे, राजू पेडणेकर आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page