कुडाळ /-
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्या वतीने बजाज सिंधुदुर्ग राईस मिल अंतर्गत कुडाळ तालुक्यातील निवजे येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ उद्या शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. भात खरेदीसाठी गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात आला होता. .यावर्षीपासून शासनाने हमीभावात ५३ रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव लागू करण्यात आला आहे. तसेच बोनस स्वरूपात गतवर्षी पेक्षा जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्याकडे पालकमंत्री उदय सामंत, खा.विनायक राऊत, आ.दिपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी भात खरेदी केंद्रे निश्चित केली आहेत.तसेच कुडाळ येथील बजाज राईस मिलमार्फतही थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात येणार आहे. प्रथमतः कुडाळ निवजे येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर उर्वरित भात खरेदी केंद्रे टप्प्याटप्याने सुरू होणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा