बांदा /-
मडुरा येथून परतत असताना पाडलोस केणीवाडा येथे दुचाकीस्वाराला महाकाय गव्याने धडक दिली. दुचाकीच्या पुढील चाकाला धक्का देत गव्याने साळगावकर यांच्या बागेत पलायन केले. तर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने अजून पाच गव्यांचा कळप येत असल्याचे पाहताच मोठ्याने हॉर्न वाजवून सर्वांना सावध केले. त्यामुळे त्या गव्यांनी गाडीच्या दहा फूट समोरून पळ काढला. वाहनचालकांनी दाखविलेल्या हुशारीमुळे थोडक्यात अनर्थ टळला. दुचाकीस्वाराच्या हुशारीमुळे कोणीही जखमी झाले नाहीत.
बांदा-शिरोडा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे रानटी प्राण्यांचा रस्त्यावर वावर मोठा आहे. झुडपे तोडण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. बुधवारी रात्रो 8.30 वाजताच्या सुमारास केणीवाडा येथील सुजीत परब हे दुचाकीस्वार मडुऱ्याहून चायनीज खाऊन घरी परतत असताना अचानक महाकाय गव्याने गाडीच्या पुढच्या चाकासमोर उडी घेतली. गाडीचा वेग कमी असल्याने त्यांनी ब्रेक लावला. त्यांच्या पाठीमागून येत असलेले समीर नाईक यांनी अन्य पाच गवे पुन्हा त्या गव्याच्या पाठोपाठ येत असल्याचे पाहीले. ग्रामस्थांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून त्यांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवत सुजीत यांना जलद गाठले. केवळ वीस सेकंदात पाच गवे आपल्या सुमारे दहा फुट अंतरावरून गेल्याचे समीर नाईक यांनी सांगितले. यावेळी रोहन सातार्डेकर, निखील परब, संकेत गवस उपस्थित होते.
ग्रामस्थांना याची खबर मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आठ दिवसांपूर्वी अशाच एका दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्याची बिबट्याने वाट अडवली होती. असे अनेक प्रकार घडूनही वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग अपघात रोखण्यासाठी कोणतीही हालचालक करत नसल्याचे सांगत ग्रामस्थांमधून रोष व्यक्त करण्यात आला.