कुडाळ तालुक्यातील तेंडोली आवेरे शाळेतील प्राथमिक शिक्षक ह्रदयनाथ गावडे यांना जाहीर..

आचरा /-

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा, शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२१ कुडाळ तालुक्यातील तेंडोली आवेरे शाळेतील प्राथमिक शिक्षक श्री ह्रदयनाथ गावडे यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती सदर पुरस्काराच्या निवडसमितीचे प्रमुख श्री सदानंद मनोहर कांबळी आणि श्री रामचंद्र एकनाथ कुबल यांनी एका पत्रकाद्वारे दिली. या पुरस्काराचे वितरण १०जानेवारी२०२१ रोजी तेंडोली आवेरे, तालुका कुडाळ या प्राथमिक शाळेत करण्यात येणार आहे. रोख रक्कम रुपये २५००/ (रुपये दोन हजार पाचशे) , मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्काराचे वितरण श्री रामचंद्र विष्णू आंगणे (उपशिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग) यांच्या हस्ते होणार आहे. सर्वस्वी ‘जी. टी. गावकर’ हे शिक्षणतज्ञ कै. वि. द. घाटे यांचे समकालीन असून महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. शाळा समाजात नेणाऱ्या आणि समाज शाळेपर्यंत आणणार्‍या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा उपक्रमशील शिक्षकास दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. श्री ह्रदयनाथ गावडे यांनी माळगांव हुमरोस, मसुरे नं १ तालुका मालवण, तेंडोली आवेरे ता. कुडाळ आदी शाळांमध्ये सेवा बजावित असताना अध्यापनासोबत कथाकथन, वक्तृत्व, गीतगायन, समुहगीत, मुलींचा दशावतार, विज्ञान प्रदर्शन, किर्तन, नाट्य आदींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना प्रावीण्य मिळवून दिलेले आहे. समाजप्रबोधन करणारे अनेक प्रश्न त्यांनी ‘किर्तन, भजन, दशावतार’ आदी माध्यमातून समाजापुढे मांडले आहेत. ते स्वतः ललित लेखक असून विविध नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. विविध पथनाट्ये, सूरमैफली सादर करताना त्यांनी समाज खऱ्या अर्थाने शाळेत आणला आहे.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर त्यांचे अभिनंदन करताना म्हणाले,”‘शाळा हे पहिले घर आणि घर ही दुसरी शाळा’ हे ह्रदयनाथ गावडेंचे कार्य मी तिनही शाळांमध्ये जवळून पाहिले आहे. कथामालेच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो.
निवड समितीच्या वतीने श्री परशुराम गुरव, श्री पांडुरंग कोचरेकर, श्री नवनाथ भोळे, श्रीमती सुगंधा केदार गुरव, श्री गुरुनाथ ताम्हणकर आदी सर्व कार्यकारिणीने त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page