आचरा /-
आचरा गावचे सुपुत्र साहित्यिक सुरेश शामराव ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या *’शतदा प्रेम करावे’* या पुस्तकाचे क्रमशः वाचन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने त्यांच्याच गृपवर क्रमशः होत आहे. सदर ललित ग्रंथाचे वाचन सौ. रश्मी रामचंद्र आंगणे यांनी केले असून त्याचे संयोजन कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या वतीने श्री रामचंद्र आंगणे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे. सदर अभिवाचनाच्या शीर्षक गीताच्या शुभारंभ प्रसंगी माननीय श्री एकनाथ आंबोकर साहेब (प्राथमिक शिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग), श्री आत्माराम नाटेकर (पत्रकार मुंबई), श्री मधुसुदन नानिवडेकर (गझलकार), श्री रुजारिओ पिंटो (केंद्रिय सदस्य कोमसाप), श्री सुरेश ठाकूर अध्यक्ष कोमसाप मालवण तथा सदर पुस्तक लेखक हे उपस्थित होते. शीर्षक गीत कल्पना मलये यांनी लिहिले असून त्या गीताला अनुक्रमे मितेश चिंदरकर, मंदार सांबारी आणि स्वतः रश्मी आंगणे यांचे स्वर लाभले आहेत. गुरुनाथ आणि तेजल ताम्हणकर यांच्या तांत्रिक अंगाने सजलेले हे शीर्षक गीत पुस्तकाचे अंतरंग वाचकांना उलगडून दाखविते. या अभिवाचनाचे उद्घाटन करताना श्री आंबोकर साहेब म्हणाले,”रश्मी आंगणे यांच्या अभिवाचनाने या पुस्तकातील संस्कारमूल्ये आणि प्रबोधनमूल्ये वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतात. सुरेश ठाकूरां सारख्या लेखकाच्या पुस्तकाचे उत्कृष्ट अभिवाचन करणाऱ्या रश्मी आंगणे या *जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका* आहेत याचा मला अभिमान वाटतो”. तर आत्माराम नाटेकर म्हणाले,” कोकणात देखणा निसर्ग आणि लोभस माणसे आचरे गावासारखी इतरत्र सापडणार नाहीत. रश्मी आंगणे यांनी हा दस्तऐवज जीवंत केला आहे.”तर रुजारिओ पिंटो म्हणाले,” सुरेश ठाकूरांचे शब्द, रश्मी आंगणे यांचा वाचिक अभिनय आणि बहारदार शीर्षक गीत ही को. म. सा. प. ची निर्मिती पाहून को. म. सा. प. चे अध्यक्ष मा. मधुमंगेश कर्णिक भारावून जातील.”गझलकार मधुसूदन नानिवडेकर म्हणाले,”शतदाच काय *’हजारदा प्रेम’* करावे, असे हे पुस्तक आहे. सुरेश ठाकूर यांनी उभारलेले शब्दशील्प तेवढ्याच प्रभावी अभिवाचनाने रश्मी आंगणे सर्वदूर पसरविणार आहेत.”यानंतर रश्मी आंगणे यांनी *’ताया श्रावणाची’* या व्यक्तीचित्राचे प्रभावी वाचन केले. को. म. सा. प. च्या वतीने दर सोमवार,बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता अभिवाचन होणार आहे. श्री रामचंद्र आंगणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.