सावंतवाडी/-

आरोंदा किरणपाणी परिसरात तेरेखोल खाडी किनारी पर्यटन प्रकल्पांना लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. तसेच शेती संरक्षक बांधारे मजबूत करण्याला प्रधान्य देण्यात येइल, असे आश्वासन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आरोंदा येथे केले.

आरोंदा-किरणपाणी येथे दीपक केसरकर यांनी रविवारी भेट दिली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, जिल्ह परिषद सदस्य राजन मुळीक, आरोंदा बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी बाळ आरोंदेकर, विद्याधर नाईक, माजी उपसरपंच अशोक नाईक, बबन नाईक गावकर, शिवसेना विभाग प्रमुख आबा केरकर, शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत नाईक, युवासेना पदाधिकारी बाबू नाईक आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

खाडी किनारपट्टीवरील सर्व शेती संरक्षक खारबंधारे दुरुस्त करून मजबूत करण्याचे काम प्रथम केले जाणार आहे. यानंतर पर्यटन प्रकल्पांची उभारणी केली जाईल.

अधिकाधिक रोजगार निर्मिती करणारे पर्यटन प्रकल्प आणावे, अशी मागणी बाळ आरोंदेकर,अशोक नाईक यांनी केली. पर्यटन प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिने संपूर्ण तेरेखोल खाडीचा सचित्र आढावा घेणार असल्याचे यावेळी केसरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार केसरकर यांनी बोटीतून कार्यकर्त्यांसोबत तेरेखोल खाडीची सफर केली. यावेळी किनारपट्टीची पाहणी करतानाच या खाडी परिसरा असलेल्या कांदळवनाचाही आढावा घेतला. या भागात शेकडो एकर जमिनीत कांदळवन पसरले आहे. या कांदळवनाचा विकास पर्यटनदृष्ट्या करावा, अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली. येथील कांदळवनाचे संवर्धन करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा या खाडीतील जैवविविधता धोक्यात येण्याची भीती यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावर आमदार केसरकर यांनी शेकडो एकर जागृत विस्तारलेल्या कांदळवनाचे निश्चितपणे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page