मसुरे /-
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही, कारण वाचनामुळेच माणसाचे जीवन समृद्ध होते, हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समग्र जीवनातून समाजाला दाखवून दिले. पुस्तकांसाठी राजगृह उभारणारा या जगातील एकमेव ग्रंथप्रेमी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो,. बाबासाहेबांच्या या ग्रंथप्रेमाची प्रेरणा घेऊन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेने प्रबुद्ध ग्रंथालयाची स्थापना केली.
दर्पण प्रबोधिनी संचलित प्रबुद्ध ग्रंथालयाच्या वतीने पुस्तकांवर बोलू काही.!या वाचनविषयक अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याला वैचारिक प्रगल्भता यावी आणि बदलत्या वर्तमान काळात चळवळीला पुढे घेऊन जाताना सामाजिक सजगता यावी या उद्देशाने परिवर्तन चळवळीला पुरक आणि पोषक अशी वाचन शृंखला निर्माण व्हावी म्हणून हा धाडसी प्रयोग संस्थेचे अध्यक्ष राजेश कदम आणि ग्रंथालयाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश कदम आणि सदस्यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या वाचन उपक्रमाला अनेक वाचकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद आणि वाचन सहभाग मिळत आहे.
पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमाची सुरूवात संस्थेचे संस्थापक कवी उत्तम पवार यांच्या ‘सत्येच्या आतबाहेर’ या काव्यसंग्रहाच्या पुस्तक रसग्रहणाने झाली. या पुस्तकावर आंबेडकरी कार्यकर्ते, कवी सिद्धार्थ गोपाळ तांबे यांनी सविस्तर विवेचन केले.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेच्या फेसबुकवर आणि युट्यूबवर वाचन विवेचनाचे दृश्यचित्रिकरण करून सर्व वाचकांसाठी ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
पुस्तकांवर बोलू काही या वाचनशृंखलेच्या दुसऱ्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मुक्ती कोन पथे? अर्थात धर्मांतर का.. या ग्रंथाचे अभ्यासपूर्ण विवेचन पूनम कदम यांनी केले.१९३६ साली मुंबई इलाखा येथे संपन्न झालेल्या ऐतिहासिक परिषदेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचा पुस्तकरुपाने प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथाविषयी वाचकांना परिचय व्हावा यासाठी विवेचनात्मक सुसंवाद घडून आणण्यात आला
तिस-या भागात प्रा.डाॅ.सोमनाथ कदम यांच्या आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज या वैचारिक ग्रंथाचे विवेचन संस्थेचे सदस्य किशोर कदम यांनी केले. बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीत मातंग समाजातील क्रांतीकारक नेते, पुढारी यांचा सहभाग महत्वपूर्ण होता. मातंग समाजाच्या क्रांतिलढ्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे, तो क्रांतीलढा प्रा.सोमनाथ कदम यांच्या ग्रंथातून वाचकांसमोर यावा यासाठी वाचकांनी अशी पुस्तके अधिकाधीक वाचून आपली वैचारिक आणि सामाजिक चळवळीची शृंखला गतिमान करावी असे विचारकिशोर कदम यांनी आपल्या विवेचनातून व्यक्त केले
दर आठवड्याला एका पुस्तकाविषयी विवेचनाचे आयोजन केले जाते. त्याचे दृश्यचित्रिकरण करून वाचक कार्यकर्ते या वाचन उपक्रमात सहभाग घेत आहेत
चौथ्या भागात सुप्रसिद्ध कथालेखिका, आंबेडकरी साहित्याच्या अभ्यासक आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या मालिकेच्या पटकथालेखिका शिल्पा कांबळे यांच्या ‘निळ्या डोळ्यांची मुलगी ‘ या कादंबरीचे विवेचन सदस्या अनुष्का तांबे यांनी काले. शोषित, अन्यायग्रस्त समाजातील स्त्रियांना कोणकोणत्या दुःखांना सामोरे जावे लागते याचे चित्रण उल्का आणि मीरा या प्रतिकात्मक मुलींच्या रुपाने शिल्पा कांबळे यांनी किती अचूकपणे चित्रण केले आहे, याचे यथार्थ दर्शन अनुष्का तांबे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून केले
पुस्तकांवर बोलू काही च्या पाचव्या भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संशोधनात्मक अनमोल ग्रंथांपैकी मानवमुक्तीचा महाग्रंथ ठरलेल्या ‘अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले’ या ग्रंथातील अस्पृश्यतेची कारणे, अस्पृश्यतेचे मूळ, वर्गवारी, माहिती, वर्णन, वस्तुस्थिती आणि सत्यता याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी किती विस्तृत आणि पारदर्शकपणे विमोचन केले याविषयी संस्थेचे सदस्य दिलीप कदम यांनी मुद्देसुदपणे विवेचन केले.
आंबेडकरी साहित्यातील उत्तमोत्तम ग्रंथांचा, पुस्तकांचा वाचकांना परिचय व्हावा आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचनापासून दूरावलेल्या नव्या पिढीला वाचनप्रक्रियेत सहभागी करुन त्यांच्या वैचारिक आणि सामाजिक, सांस्कृतिक विचारधारेला अधिक गतिमान करावे ,यासाठी ही वाचनशृंगला अखंडित सुरू ठेऊन चळवळीतील वाचक कार्यकर्त्यांना अधिक सजग बनविण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने राहील असा आशादायक विचार संस्थाध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त केला, या अभिनव वाचन उपक्रमाचे कौतुक महाराष्ट्रातील नामवंत लेखक, वाचकांकडून केले जात आहे
पुस्तक विवेचनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे दृश्यचित्रीकरण सहकार्यवाह विशाल हडकर करत असून संयोजन कार्यवाह आनंद तांबे आणि ग्रंथालय प्रमुख प्रकाश कदम यांनी केले.