जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक सेवा सुरू..

जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक सेवा सुरू..

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक सेवा सुरू करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे. कोविड-१९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांस अधिन राहून अटी व शर्तीनुसार हि मान्यता देण्यात आली आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्हाधिकारी हे पदसिध्द अध्यक्ष आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या त्यावेळी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. किल्ला प्रवासी बोट वाहतूक सेवा सुरू करण्याची मागणी किल्ले प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत व संघटनेच्या सदस्यांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कोविड-१९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांस अधिन राहून, सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक सुरू करणेस खालील अटी व शर्तीनुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे.

*अटी व शर्ती पुढीलप्रमाणे*
सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोशिएशने दर दिवशी एका बोटीच्या फक्त दोन फे-या होतील एवढ्याच फे-यांचे नियोजन करावे.प्रवासी वाहतूक करतेवेळी सामाजिक अंतर पाळावे, बोटी सॅनिटाईझ करणे, पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना देणे, मास्क व सॅनिटाईझ वापर इ. बाबत नियोजन करणेची जबाबदारी संस्थेची राहील. येणा-या प्रवाशांना सामाजिक अंतर राखणेबाबत सूचना देण्यात याव्यात,बुकिंग ऑफीसच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणेसाठी खुणा करणेत याव्यात, येणा-या प्रवशांची सामाजिक अंतर राखून तपासणी करण्यात यावी, यामध्ये पर्यटकांचे तापमान, ऑक्सीजन पातळी तपासावी,येणा-या प्रवशांचे नाव, पत्ता, वय, तापमान व मागील १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती रजिस्टरमध्ये नोंद करण्यात यावी, बुकिंग ऑफीस येथे पर्यटकांना ई-पेमेंट सुविधा देण्यात यावी.ऑनलाईन बुकिंग करीता प्राधान्य देण्यात यावे,ज्या प्रवाशांना तापमान ३८.० किंवा १००.४ पेक्षा जास्त आहे व ऑक्सीजन पातळी ९५ पेक्षा कमी असेल अशा प्रवाशांना प्रवास करणेपासून प्रतिबंध करण्यात यावा. ज्या पर्यटकांना कोविड १९ सदृश्य लक्षणे उदा.सदी,खोकला, ताप इत्यादी लक्षणे असल्यास प्रवासासाठी प्रतिबंध करण्यात यावा व दवाखण्यात संदर्भित करण्यात यावे. तिकीट विक्री ठिकाणी असलेल्या कर्मचारी यांनी मास्क,ग्लोव्ज,फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक राहील.बोटमन यांनी मास्क,ग्लोव्ज,फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक राहील. येणा-या सर्व प्रवासी यांनी मास्क,ग्लोब्ज,फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक राहील.तिकीट मिळालेनंतर जेटीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळून बोट प्रवाशांना प्रवेश देण्यात यावा.गर्दी होणार नाही यावी दक्षता घ्यावी.एका बोटीमध्ये सामाजीक अंतर पाळून जास्तीत जास्त ६ पर्यटक व १ चालक यापेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये, सहली व अथवा मोठ्या समूहांना (ग्रुप) ला एकत्रित प्रवास करण्यास प्रतिबंध करावा.प्रत्येक फेरीच्या वेळी बोट निर्जंतुक करणे बंधनकारक राहील, वेळोवेळी शासनामार्फत देण्यात येणा-या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील,प्रवासी बोट वाहतूकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेणे बंधणकारक राहील. उपरोक्त नमूद अटी, शर्तीचा भंग केल्यास त्याचप्रमाणे विषाणू संसर्ग होईल असे कोणतेही कृत्य केल्यास सदर परवानगी रद्द झाली असे समजण्यात येईल, व संबधित व्यक्ती,संस्था, समूह यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील तरतुर्दीप्रमाणे कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

अभिप्राय द्या..