आचरा /-
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या वतीने दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी रंगभूमी दिनी ज्येष्ठ नाटककार आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व ‘पु.ल. देशपांडे गौरवगीत’ चित्रफितीचे उद्घाटन सुरेश ठाकूर अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण यांच्या हस्ते online झाले. या चित्रफितीत पु. लं. च्या वाङ्मयीन, सांस्कृतिक, चैतन्यशील आणि रंगभूमी विषयीच्या योगदानावर आधारित गीतरचना केली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे आजीव सदस्य आणि गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांनी ही गीतरचना केली असून को. म. सा. प. मालवणचे संगीत दिग्दर्शक माधवराव गावकर यांनी याला संगीत आणि स्वर दिलेला आहे. याची निर्मिती गुरुनाथ ताम्हणकर आणि तेजल ताम्हणकर यांनी केली आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना सुरेश ठाकूर म्हणाले, पु. ल. देशपांडे यांचा वाढदिवस 8 नोव्हेंबर 2020 ला येत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला कोकण मराठी साहित्य परिषद मालवण ही निर्मिती करत आहे. पु. ल. देशपांडे यांनी ज्या रंगभूमीसाठी आपले योगदान दिले, त्या रंगभूमी दिनादिवशीचे औचित्य साधून आम्ही या चित्रफितीची निर्मिती आज रंगभूमी दिनी करीत आहोत.’ पु.ल.देशपांडे हे मराठी मनाच्या जीवनातील एक चैतन्यशील लेणे आहे. विनोद, नाट्य, ललितलेखन, व्यक्तीचित्रण, प्रवासवर्णन, सामाजिक चिंतन अशा अनेक अंगांनी पु. लं.च्या लेखनाने महाराष्ट्र घडविला. अर्धशतक मराठी मनाचे रंजन आणि उद्बोधन केले. त्याबरोबर रंगमंच आणि रजतपट यावरील अभिनयाच्या आणि संगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राला आनंद दिला. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या या चित्रफितीत तो संगीत रुपाने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सर्वांना आमची ही पु. ल. भेट नक्कीच आवडेल.
यावेळी गीतकार मधुसुदन नानिवडेकर, गायक आणि संगीतकार माधवराव गावकर, निर्मिती प्रमुख गुरुनाथ ताम्हणकर आणि रुजारिओ पिंटो केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.