मालवण /-
मालवण शहरातील कचरा उचल व वाहतूक कामी नगरपालिकेच्या माध्यमातून ठेका पद्धतीने कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ठेकेदार कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. अखेर कर्मचाऱ्यांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडत गुरुवारी सकाळी कामबंद आंदोलन छेडले.
दरम्यान, दुपारी सर्व सफाई कर्मचारी व वाहन चालक यांनी यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे यांची भेट घेतली. ठेकेदाराने आमचा मेहताना वेळेत जमा करावा. या प्रमुख मागणीसह अन्य समस्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या.
यावेळी नगराध्यक्ष यांनी ठेकेदारवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले. तर कर्मचाऱ्यांना यापुढे कोणत्याही समस्या असल्यास त्या लेखी स्वरूपात द्या. ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल. असे स्पष्ट केले. आम्ही कामगारांविषयी राजकारण केले नाही आणि करणारही नाही. दर महिन्याला ठेकेदाराने कामगारांचा मेहनताना द्यावा. याची खात्री आम्ही देतो असे नगराध्यक्ष व उपस्थितांनी स्पष्ट केले.एकूणच यशस्वी चर्चे नंतर सफाई कर्मचारी व वाहन चालक यांनी नगराध्यक्ष, बांधकाम सभापती व आरोग्य सभापती यांचे आभार मानले. आंदोलन स्थगित करत शहरात साफसफाई काम नियमितपणे सुरू केले.