कुडाळ /-

बॅ. नाथ पै अभ्यासकेंद्र कुडाळच्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचा १०० टक्के निकाल लागला आहे. यात सरंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेकानंद बालम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसाठी आवश्यक असलेला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम (डीएसएम) हा सन २००६ पासून बॅ. नाथ पै बीएड कॉलेजमध्ये सुरु आहे. या शिक्षणक्रमाच्या माध्यमातून अनेक मुख्याध्यापकांना आपली पदोन्नती पूर्ण करता आली आहे.

तसेच शालैय स्तरावरील दैनंदिन व्यवस्थापन व प्रशासन कुशलपणे हाताळण्यासाठी व शाळेच्या संदर्भातील मुख्याध्यापकांची असलेली जबाबदारी अधिक चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी या शिक्षणक्रमाची फारच मदत झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेत एकूण ४३ शिक्षक प्रविष्ठ झाले होते. सर्व शिक्षक विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन शिक्षणक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

यामध्ये प्रथम क्रमांक विवेकानंद बालम (९७.३८), द्वितीय क्रमांक कासाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र नारकर (९७.२५) तर तृतीय क्रमांक अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवणचे सहाय्यक शिक्षक दत्तप्रसाद खानोलकर व
मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल, पालीचे सहाय्यक शिक्षिका मानसी पाखरे.(९७.००) यांनी यश संपादन केले. या उज्ज्वल यशाबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश सुंदर गाळवणकर, तसेच शालेय व्यवस्थापन शिक्षणक्रमाचे केंद्रसमन्वयक नितीन साबाजी बांबर्डेकर यांनी अभिनंदन केले आहे. या सर्व शिक्षकांना प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, प्रा. डॉ. दीपाली काजरेकर, जयवंती परब, पांडुरंग पाटकर व संगणक सहाय्यक किरण सावंत यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page