सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ महिला पत्रकार, थोर समाज सेविका व राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या सिंधुकन्या समाजभुषण मीराताई जाधव (९३) यांचे आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या पहिल्या महीला पत्रकार होत्या.
साप्ताहिक सत्यप्रकाशच्या त्या माजी संपादक होत्या. आदर्श शिक्षिका म्हणून नावाजलेल्या मिराताई जाधव त्याकाळात बँडमिंटन, पोहणे, हस्तकला यात निष्णात होत्या. १९७७ मध्ये मीराताई यांची स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती झाली होती. संस्थान काळात सावंतवाडी राजघराण्यातील स्त्रियांच्या बरोबरीने उपक्रमात सक्रिय त्या सामील होत्या.
जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील स्त्रियांसमोर त्या एक आदर्श होत्या. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहीत्य, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा सच्चिदानंद, मुलगी सुवर्णरेखा असा परिवार आहे. नाट्यकर्मी दिवंगत बाप्पा धारणकर यांच्या त्या कन्या तर कै. दिनकर धारणकर यांच्या भगिनी, सत्यप्रकाशचे संपादक हर्षवर्धन धारणकर तसेच सत्यजीत धारणकर यांच्या त्या आत्या होत.