मालवण /-
कोरोना काळात शासनाच्या वतीने रेशन दुकानामार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धान्य वितरणात बिळवस गावात गैरव्यवहार झाला आहे. रेशन दुकानदाराकडून मनमानी कारभार सुरू असूूून लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप राहुल गोविंद सावंत यांनी करून याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी, माहितीच्या अधिकारात मिळवलेली धान्य उचल माहिती त्यांनी तहसीलदार यांच्याकडे सादर केली होती याप्रकरणी चौकशी केली जाईल, असे तहसीलदार अजय पाटणे यांनी स्पष्ट केले होते
अनेक कुटुंबांच्या नावे धान्याची उचल झालेली ऑनलाईन नोंदीत दिसून येते मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही. काहींना तुमचे नाव अन्य जिल्ह्यात आहे असे सांगितले जाते. मात्र माहितीच्या अधिकारात यादी मागवली असता वेगळे चित्र दिसून आले आहे. अंत्योदय मधील १२, अन्न सुरक्षा मधील ११, बीपीएल मधील ४ अशी कार्ड मयत अथवा अन्य ठिकाणी वास्तव्यास आहेत. याबाबतही तपासणी व्हावी. रेशन दुकानातील सर्वच कारभारात गैरव्यवहार दिसून येत आहे. होणारे धान्य वितरणही सदोष आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती.मालवण तहसील कार्यालयाने आरोपाची गंभीर दखल घेतली असून पुरवठा शाखेने संबंधित तक्रारदार व धान्य दुकानदार यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.