कणकवली /-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आक्रमक भाषणानंतर विरोधकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांनी तर सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
परंतु राणे यांनी आता बोलताना भान ठेवावे आणि बेताल बोलणे बंद करावे तसेच त्यांची बेइमानी वृत्ती सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना धोकादायक आहे. असे मत शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केले आहे. आपल्या अपयशी आणि नादान मुलांचा राग नारायण राणे दुसऱ्यांच्या मुलावर का काढतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नारायण राणे यांनी प्राप्त केलेली ओळख ही फक्त आणि फक्त शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच आहे. राणे यांच्या उभ्या असलेल्या सर्व संस्था ह्या फक्त आणि फक्त शिवसेना आणि ठाकरे यांनी दिलेल्या आधारामुळेच उभ्या आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
नारायण राणे यांचा राजकारणातील मावळलेला सूर्य हा त्यांच्या दोन्ही मुलांनी केलेल्या कर्माची फळे आहेत. परंतु आदित्य ठाकरे यांनी आपल्या वडिलांसोबत कुटुंबाचे मोठे केलेले नाव पाहून राणे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याचे ते म्हणाले आहेत. राणे यांनी पुराव्याशिवाय ठाकरे कुटुंबावर केलेली टिका ही निषेधार्थ असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.