कुडाळ /-
गेली अनेक वर्षे एकाच खुर्चीवर बसून कामगारांची पिळवणुक करणाऱ्यांनी आता आंदोलनाची भाषा करू नये. मान्यता प्राप्त संघटनेच्या लेबलचा फायदा घेऊन कामगारांचीच नाही तर एसटीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा दबावात टाकून अनेक वर्ष स्वत: ची पोळी भाजून घेणाऱ्यांना आता अचानक कामगारांच्या भल्याच सुचल तरी कस, ज्यांनी कामगार जगो अथवा मरो याची कधीही पर्वा केली नाही त्यांनी आता कुठल्याही प्रकारची नौटंकी करु नये, असा सल्ला दिलीप साटम यांना महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकातून यांना दिला.
साटम यांनी मान्यता प्राप्त संघटनेनी कर्मचाऱ्यांचे कधीही भले बघितले नाही..तसेच वेगवेगळी आमिषे दाखवून कामगारांना आपल्या संघटनेची पावती फाडायला भाग पाडले. आज जी काही परिस्थिती कामगारांची झाली आहे, त्याला एसटी कामगार संघटनाच जबाबदार असल्याचे सांगत आजतागत अनेकवेळा अनेक करारात त्यांनी कामगारांचे हीत कधीच बघितले नाही. उलट प्रशासनाला जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडेच संघटनेचे लक्ष राहीले आहे, असे गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केले.
प्रशासन व कामगार संघटनाही हातात हात मिळवुनच प्रशासनाचा कसा फायदा होईल हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इतकी वर्ष ही संघटना काम करत आली आहे, असा टोलाही नाडकर्णी यांनी लगावला. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार सेनेची आंदोलन जाहीर होताच ९ नोव्हेंबरला आक्रोश आंदोलन करणार असल्याचे जाहीर करून कामगारांसाठी काय तरी करून दाखवण्याचा दिखावूपणा करण व नौटंकी करणं साटम यांनी बंद कराव, अशी ताकीदही नाडकर्णी यांनी दिली. मान्यता प्राप्त संघटना जर प्रशासनावर दबाब टाकून कामगारांचे पगार मिळवुन देवु शकत नाही तर दिलीप साटम यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असा सल्लाही नाडकर्णी यांनी साटम यांना दिला.