आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार राज्यमंत्री यड्रावकर यांचे आदेश
मुंबई, /-
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निर्देशानंतर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी व सीटी स्कॅन चाचण्यांची प्रलंबित देयके अदा करण्याकरीता स्वीय प्रपंजी खात्यामधून खर्च करण्याची परवानगी आरोग्य सेवा संचालनालयाने दिली आहे. यासंदर्भात राज्यमंत्री यड्रावकर यांनी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता, यावेळी कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी सदर विषयाबाबत राज्यमंत्री यड्रावकर यांच्याकडे मागणी केली होती.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील सन २०१५-१६पासून सप्टेंबर २०१८ पर्यंतच्या कालावधीतील सोनोग्राफी चाचण्या व सीटी स्कॅन चाचण्यांची रुपये २७ लाख ११ हजार ४५० एवढी देयके प्रलंबित होती. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील स्वीय प्रपंजी खात्यामध्ये रुपये ८६ लाख १० हजार ६४७ एवढी रक्कम शिल्लक आहे. या शिल्लक रकमेतून सदर प्रलंबित देयके अदा करण्यात यावीत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्यमंत्री यड्रावकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार राज्यमंत्री यड्रावकर यांनी आरोग्य सेवा संचालनालयाला याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे सोनोग्राफी व सीटी स्कॅन चाचण्यांची प्रलंबित देयके अदा करण्याकरीता स्वीय प्रपंजी खात्यामधून खर्च करण्याची परवानगी आरोग्य सेवा संचालनालयाने दिली आहे.
राज्यमंत्री यड्रावकर यांनी केलेल्या या विशेष प्रयत्नामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी व सीटी स्कॅन चाचण्यांची प्रलंबित देयके तत्काळ अदा होणार आहेत.