नवी दिल्ली /-
‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
*समावेश* : चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. भारतीय लष्करामध्ये या क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाईल.
*महत्त्वपूर्ण* : पूर्व लडाख सीमेवर तणावाची स्थिती असताना, नाग क्षेपणास्त्राने चाचणीचा अंतिम टप्पा पार करणे, खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण तिथे दोन्ही देशांचे रणगाडे परस्परांच्या रेंजमध्ये आहेत.
*यशस्वी* : नाग क्षेपणास्त्राची आजची दहावी चाचणी यशस्वी ठरली. त्यामुळे लष्करात या क्षेपणास्त्राचा समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
डीआरडीओने मागच्या महिन्याभरापासून क्षेपणास्त्र चाचणीचा धडका लावला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फक्त निर्भय या १ हजार किलोमीटर रेंज असलेल्या क्षेपणास्त्राच्या चाचणीत तांत्रिक अडथळा उदभवला होता. नेमका बूस्टरमध्ये कुठे बिघाड झाला होता, ते शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.लवकरच निर्भय सबसॉनिक क्षेपणास्त्राची सुद्धा चाचणी होईल. नाग क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी होणे म्हणजे, चार किलेमीटरपर्यंतच्या अंतरासाठी भारताला आता इस्रायल, अमेरिकेकडून क्षेपणास्त्र आयात करण्याची गरज उरणार नाही.