मुंबई /-
▪️राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश दिला असून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. देवेंद्र फडवणीस सध्या काही पूरग्रस्त ठिकाणांचा दौरा करत असून यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. करोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच भरवणार असल्याचं ते म्हणाले आहेत. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
▪️”जी काही चौकशी करायची असेल ती त्यांनी जरुर करावी. ही मंत्रालयात सह्या करुन टेंडर दिलेली कामं नाहीत. सहा लाख कामं झाली आहेत. सहा लाख कामं विकेंद्रीत पद्धतीनं झाली आहेत. जिल्हाधिकारी यांचे प्रमुख होते. त्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद, कृषी विभाग, जलसंधारण, वन विभागानं कामं केली आहेत. एक लाखापासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामं आहेत. स्थानिक पातळीवर टेंडर काढून ही कामं झाली आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं