सिंधुदुर्गनगरी /-

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने हाती घेऊन 10 दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिल्या. नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आज पालकमंत्री उदय सामंत यांनी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची आढावा बैठक घेतली. त्यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी या सूचना दिल्या.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, कृषि अधिक्षक, विभागीय कृषि अधिकारी, सर्व तालुका कृषि अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पावसाने जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसनीची पाहणी करण्यासाठी आज जिल्हा दौरा केल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, फक्त भाताचेच नाही तर नाचणी, आंबा, काजू यासह सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. सर्व ग्रामसेवक, तलाठी आणि कृषि सहाय्यक यांची उद्या बैठक घेऊन तातडीने पंचनामे करण्याविषयाच्या सुचना तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांनी द्याव्यात. पंचनामे करत असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवी याचा विचार करावा, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पंचनामे करावेत. सध्याच्या आकडेवारी नुसार प्राथमिक नुकसान 10 हजार हेक्टरचे झाल्याचे दिसते. प्राथमिक नुकसान जरी इतके असले तरी त्यामध्ये आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तरी त्यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे तयार करावेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणे ही आमची भूमिका आहे. ज्या ठिकाणी पंचनाम्यांविषयी लोकांच्या तक्रारी असतील तेथे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. गेल्या वर्षी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई ज्यांना अद्याप प्राप्त झालेली नाही, त्यांना येत्या दोन दिवसात सर्व रक्कम देण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.
यंदा 25 केंद्रांवर 50 हजार क्विंटल भात खरेदी
यंदाच्या वर्षी भात खरेदीसाठी 25 केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात किमान 50 हजार क्विंटल भाताची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी नामगेव गवळी यांनी यावेळी दिली. सदरची भात खरेदी ही 1 हजार 868 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे. तसेच यावर बोनसही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर खरेदी नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावी अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिल्या. तसेच बोनसचा प्रस्ताव व खरेदी मंजुरीसाठीचा प्रस्ताव तातडीने पाठवून तो मंजूर करून घ्यावा. त्यासाठी काही मदत लागल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशा सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी शेतीच्या नुकसानीचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेतला. तसेच भातासह नाचणी, आंबा, काजू आणि इतर पिकांच्याही नुकसनीचे पंचनामे करून त्यांचा समावेश नुकसानीमध्ये करण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकारीवर्गाला दिल्या. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वी जास्तीत जास्त पंचनामे करावेत व गेल्या वर्षीची नुकसान भरपाई द्यावी अशा सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.
* सोबत फोटो जोडला आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page