नीट परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या आशिष झाट्ये व जान्हवी लाड यांचा भव्य नागरी सत्कार..
मालवण /-
आजवर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणाऱ्या आशिष झाट्ये याने त्याचे कौतुक करण्याची संधी आम्हाला अनेकवेळा दिली. मात्र आजच्या त्याच्या यशाबद्दल कौतुक व सत्कार करताना विशेष आनंद होत आहे. नीट परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आशिषने मालवणचे नाव शिक्षणाच्या क्षेत्रात राज्यासह देशात उंचावले आहे. मालवणसारख्या छोट्या शहरात राहून देखील देशात नाव उंचावू शकतो ही प्रेरणा आशिषने इतर मुलांना दिली आहे. म्हणूनच आशिषचे यश मालवणसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे, असे कौतुकोद्गार आमदार वैभव नाईक यांनी काढले.
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेत देशात १९ वा आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कु. आशिष अविनाश झाट्ये याचा भव्य नागरी सत्कार सोहळाआमदार वैभव नाईक व नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या वतीने मालवण येथील दैवज्ञ भवन सभागृहात संपन्न झाला. यावेळी नीट परीक्षेत देशात १४८८ वा क्रमांक मिळविणाऱ्या कट्टा पराड येथील कु. जान्हवी लाड हिचा देखील सत्कार करण्यात आला. भव्य पुष्पहार व भेटवस्तू देऊन या दोघानाही आमदार वैभव नाईक व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तत्पूर्वी भरड नाका येथील आशिष झाट्ये व जान्हवी लाड यांची शहरातून बाजारपेठ मार्गे दैवज्ञ भवन पर्यंत विजयी रॅली काढण्यात आली.
सोशल डिस्टनसिंग नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यास व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे, डॉ. शशिकांत झाट्ये, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, डॉ. शिल्पा झाट्ये, डॉ. अविनाश झाट्ये, श्री. विष्णू लाड, सौ. वैष्णवी लाड, कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेश अंधारी, साईनाथ चव्हाण, मनसेचे अमित इब्रामपुरकर, साईनाथ, नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, नितीन वाळके आदी व इतर उपस्थित होते.
प्रारंभी नितीन वाळके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुदेश आचरेकर यांनी आशिषचे यश हे केवळ मालवणसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब आहे. आपल्या कामगिरीने आशिषने राज्यासह देशात मालवणची वेगळी ओळख दाखवली आहे असे सांगितले. तर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून अव्वल क्रमांकामध्ये स्थान मिळविणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. म्हणूनच आशिष व जान्हवी यांचे यश उल्लेखनीय असे आहे, असे सांगितले. यावेळी आशिष याचे आजोबा डॉ. शशिकांत झाट्ये यांनी आज दहावी बारावी परीक्षेत राज्यात सिंधुदुर्गाचा निकाल सर्वाधिक लागत असेल तरी दहावी बारावी नंतर लागणारे मार्गदर्शन मुलांना मिळत नाही. असे मार्गदर्शन मिळाल्यास मुले अधिक प्रगती करतील असे सांगितले. तर आशिष याचे वडील डॉ. अविनाश झाट्ये यांनी हा सत्कार सोहळा नेहमी लक्षात राहील अशी भावना व्यक्त सत्काराबद्दल आभार मानले. तर जान्हवी हिची आई वैष्णवी लाड यांनी आज मालवणवासीयांनी केलेले कौतुक आशिष व जान्हवी यांना पुढील यशाचे शिखर गाठताना उपयोगी पडेल, नवी प्रेरणा मिळेल, असे सांगितले. यावेळी नितीन तायशेटे, बाळासाहेब पंतवालावलकर यांनीही कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी आशिष झाट्ये याने सत्काराला उत्तर देताना आपल्या या यशात आई वडिलांचे साथ आणि मोठे मार्गदर्शन लाभले. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे योगदानही महत्वाचे आहे. आपण आव्हाने स्वीकारत आणि धोके पत्करत एखादे यश मिळविण्यासाठी मागे लागले पाहिजे. त्यासाठी योग्य नियोजन व प्रयत्नांचे सातत्य ठेवले पाहिजे. या सर्वांमुळेच मी यश मिळवू शकलो आहे असे सांगत आभार व्यक्त केले. तर जान्हवी लाड हिने आज आमच्या यशाबद्दल सर्वजण दखल घेत आहेत ही आनंद देणारी गोष्ट आहे. सर्वांचे प्रेम असेच कायम राहावे, यापुढेही आमच्या कामगिरीने असे अभिमानास्पद क्षण तुम्हाला देत राहू, यशाच्या शिखरावर पोहचू असा विश्वास व्यक्त करत आभार मानले.
यावेळी मालवणातील सामाजिक संस्था, शैक्षणीक संस्था, वैद्यकीय संस्था , राजकीय पक्ष यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आशिष झाट्ये व जान्हवी लाड यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.