रत्नागिरी /-
कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही, यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी शपथ सर्वांनी घ्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले.
दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने आज या सुविधेचे उद्घाटन झाले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पाहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमास मुंबईतून पालकमंत्री ॲङ अनिल परब, जालन्यातून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रत्नागिरीतून उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांच्या सोबतच खासदार विनायक राऊत दिल्ली येथून सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.