नीट परीक्षेत मालवणचा आशिष अविनाश झांटये राज्यात प्रथम..

नीट परीक्षेत मालवणचा आशिष अविनाश झांटये राज्यात प्रथम..

मालवण /-

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल आज रात्री उशिरा जाहीर झाला. यात मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांटये याने ७१० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

नीट परीक्षेचा निकाल आज रात्री उशिरा जाहीर झाला. यात ओडिशाचा शोएब आफताब व दिल्लीच्या आकांक्षा सिंग यांनी ७२० गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला. तर मालवणच्या आशिष झांटये याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तेजोमय नरेंद्र वैद्य, पार्थ संजय कदम व अभय अशोक चिल्लरगे या तिघांनी ७०५ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. देशातील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या ५० विद्यार्थ्यांमध्ये या चार जणांचा समावेश आहे.

१३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली. देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. दिवसभर एनटीएचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. अखेर उशिराने हा निकाल जाहीर झाला.
आशिष झांटये हा येथील डॉ. अविनाश व डॉ. शिल्पा झांटये यांचा सुपुत्र होय. येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलचा आशिष हा माजी विद्यार्थी होय. नीट परीक्षेत आशिष याने मिळविलेल्या यशाने मालवणच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. आशिष याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..