कुडाळ :/-
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन तर्फे दरवर्षी होणारी भात खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यंदा केंद्र सरकारने भाताला १,८८८/- रु. दर मंजूर केला आहे. अतिवृष्टीने भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनातही घट झाली आहे परंतु जे काही उत्पादन होईल त्याला केंद्र शासन १,८८८/- रु. भाव देणार आहे. गेल्यावर्षी हा भाव १,८१५/- रु. होता व शासनाने नंतर ७००/- रु. बोनस जाहीर केला होता त्यामुळे २,५१५/- रु. प्रती क्विंटल एवढा भाव मिळाला होता. गेल्यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ९२२०५ पोटी भात शासनाने खरेदी केले होते. कुडाळ तालुक्यात गेल्यावर्षी ५७४ शेतकऱ्यांनी १८८८३ पोटी भात शासनाला दिले होते. गेल्या वर्षी भात खरेदीची प्रक्रिया फारच उशिरा सुरु झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना कमी दारात भात घातल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तरी भात उत्पादक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना भात न देता शासनाला भात देऊन आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये असे आवाहन कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक निलेश तेंडुलकर यांनी केले आहे.