मराठीतील प्रसिद्ध लेखिका स्वप्नगंधा कुलकर्णी यांचे निधन..

मराठीतील प्रसिद्ध लेखिका स्वप्नगंधा कुलकर्णी यांचे निधन..

मसुरे /-

मालवण तालुक्यातील माळगाव- बागायतच्या रहिवासी, मराठीतील ख्यातनाम लेखिका स्वप्नगंधा गुरुनाथ कुलकर्णी (७५ वर्ष) यांचे गुरुवारी पहाटे ३ वाजता मूत्रपिंडाच्या आजाराने मुलुंड- मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस कै. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या त्या पत्नी होत.
मालवणी भाषेतील त्यांचे अनेक कविता संग्रह, तसेच कॅसेट प्रसिद्ध झाल्या होत्या. मागील काही महिने त्या मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होत्या. त्यांच्यावर नियमित डायलिसिस चालू होते. कोरोना मधून बरे होऊन त्यांचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आला होता.
अनेक वृत्तपत्रामध्ये त्यांची विविध सदरे प्रसिद्ध होत होती. मन मोगऱ्याची फुलं, गंगा प्रवाह, बैरागी बगळा अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांची मातीतील मोती एकांकिका लक्षवेधी ठरली होती.मुंबईतील एस एन डी टी या नामवंत शिक्षण संस्थेत त्यांनी शिकविण्याचे कार्य केले होते. आकाशवाणीवर त्यांच्या श्रुतिका आणि दूरदर्शन वरील त्यांच्या नाटिका सर्वांच्या परिचयाच्या ठरल्या होत्या. चिचू माझी बाहुली, बम चीक बम बम, बैरागी बगळा, गर्विष्ठ चांदणी यासारखे बालसाहित्य ही त्यांनी लिहिले होते. नृत्य, नाट्य, काव्य, कथा आणि कादंबरी या क्षेत्रातही त्यांचा नावलौकिक होता. मालवणीतील साहित्य लेखनातील गोडवा त्यांनी मालवणी कॅसेटच्या मधून घराघरात नेली होती.
त्यांच्या पश्चात मुलगी, जावई असा परिवार आहे. मुलगी अमेरिकेत राहत असल्याने त्या मुंबईत आल्या नंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित ऍड.गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कुल माळगावच्या त्या अध्यक्ष होत्या.

अभिप्राय द्या..