अतिवृष्टीमुळे भातपीकाच्या झालेल्या नुकसानीकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले कृषीमंत्र्यांचे लक्ष..
सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता भातपिक नुकसानीचे कृषिविभागामार्फत पंचनामे करावेत अशा मागणीचे पत्र दिले.त्यावर ना.दादा भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा हा सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसाला असल्या कारणाने जिल्ह्यामधील ९०% लोक हे शेती करून यामाध्यमाने आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कोकणात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उन्हाळी व पावसाळी शेती असे शेतीचे दोन प्रकार असून वेगवेगळ्या पिकांसोबत मोठ्या प्रमाणात भातपिक लागवड केली जाते. परंतू कोकणात केली जाणारी शेती हि पावसावर अवलंबून असते. यावर्षीचा विचार केला असता दरवर्षी पेक्षा दिडपट जास्त पाउस पडला आहे. तब्बल सरासरी ५००० मि.ली. पाउस पडल्याने या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भातपिकाच्या झालेल्या नुकसानीचा विचार केला असता, जुलै/ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतक-यांची नविन चालू असलेली भातपिकाची लावणी वाहून गेली. तर यानंतर आलेली वादळे व आता सतत चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे कापणी योग्य झालेले भातपिक जमिनीवर कोसळुन त्याला पुन्हा नव्याने अंकुर आले आहेत.यामुळे भातपिकाची नासाडी झाली आहे. त्याचबरोबर भात पिकातून गुरांना चाऱ्याच्या स्वरूपात मिळणारे गवत देखील कुजून गेले. सतत चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. याकडे आ.वैभव नाईक यांनी ना.दादा भुसे यांचे लक्ष वेधले.
शेतक-यांना या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याकरिता भातपिक नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहेत. तरी पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागास देण्यात यावेत. अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.त्यावर ना.दादा भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.