सिंधुदुर्गातील रहिवासी सफाईगार कामगारांचे नियुक्ती देण्यात आलेले नामनिर्देशित वारस मात्र परजिल्हयातील.
मनसेच्या तक्रारीची विभागीय आयुक्तांनी घेतली गंभीर दखल…चौकशी समिती स्थापन…
सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार होऊन आर्थिक गैरव्यवहारातून परजिल्हयातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. मुळात महाराष्ट्र शासनाने लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार अनुसुचित जाती मधील मेहतर, वाल्मिकी व भंगी समाजाच्या शैक्षणीक आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या दि.21.10.2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या खऱ्या वारसांना शासकीय व निमशासकीय सेवेत नियुक्ती देणेबाबतच्या मार्गदर्शक सूचना पारीत केलेल्या आहेत. या शासन निर्णयाप्रमाणे सफाई कर्मचारी त्याच्या निवृत्तीपश्चात आपल्या कायदेशीर वारसास किंवा सांभाळ करण्याची लेखी हमी देण्याऱ्या जवळच्या नातेवाईक नामनिर्देशित वारसास वारसा हक्काप्रमाणे नोकरी देण्याची तरतूद आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सन 2017 पासून आजपर्यंत नोकरी दिलेल्या 05 प्रकरणातील नियुक्त्यांमध्ये लाखो रुपयांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून ज्यांचा सफाई कामगाराशी नात्यातला कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष थेट संबंध येत नाही अश्या चक्क परजिल्हयातील उमेदवारांना नोकरी बहाल केलेली आहे. यामध्ये एका प्रकरणात हिंदू सफाईगार कामगाराचा नामनिर्देशित वारस हा मुस्लीम आहे, तर दुसऱ्या एका प्रकरणात सफाईगार कर्मचाऱ्याचा वारस हा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील सफाईगार आस्थापना टेबल सांभाळणाऱ्या लिपीकाचीच पत्नी ही वारस दाखवून नियुक्ती दिलेली आहे. शिवाय या सर्व नियुक्त्या लाड-पागे समिती संबंधीत सर्व शासन परिपत्रकांचे व मार्गदर्शक सूचना पायदळी तुडवून व मर्जीप्रमाणे चूकीचा अर्थ लाऊन मेहतर, वाल्मिकी व भंगी समाजाव्यतिरीक्त इतर प्रवर्गांतील उमेदवारांना वरिष्ठ पदांवर नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. शिवाय हा सर्व गैरप्रकार करत असताना जिल्हयातील सफाईगार कामगारांच्या खऱ्या वारसांचे प्रस्ताव हे शासन निकष व जाचक अटी लाऊन फेटाळून लावत नामंजूर करणेत आले तर अर्थपूर्ण व्यवहार करणाऱ्या परजिल्हयातील उमेदवारांचे प्रस्ताव मंजूर करणेत आले ही खेदाची बाब असून जिल्हयातील विविध पक्षांचे लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून काम करणारे जिल्हा परिषद सदस्य मूक गिळून गप्प बसले आहेत, हे खरे जिल्हयातील जनतेचे दुदैव आहे. सन 2019 च्या महाभरतीसाठी शासनाकडून जिल्हा परिषद अधिनस्त विविध संवर्गांच्या रिक्त पदांचा गोषवारा मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी करुन शासनाकडे सादर करण्याचे आदेश असतानादेखील कनिष्ठ सहाय्यक(लिपीक) या संवर्गाची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेऊन ती वरिष्ठ कार्यालयाकडे सादर न करता चक्क सफाईगार आस्थापना टेबल सांभाणाऱ्या कनिष्ठ लिपीकाच्या पत्नीची त्या पदावर भरती करण्यात आली.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये कार्यरत श्री.उप्पलवार, श्री.प्रभू, श्री.मुल्ला, श्री.शेटये, श्री.जाधव नामक कर्मचारी सेवानिवृत्त होणाऱ्या सफाईकामगारांच्या घरी जाऊन त्यांना पैश्यांचे आमिष दाखवून सदरचा भ्रष्ट कारभार करत आहेत. ज्यांना जिल्हा परिषद आरोग्य विभागातील व सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ भ्रष्ट अधिकारी खतपाणी घालत सदरच्या नियुक्त्या देत सूटले आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे. शिवाय या सर्व नियुक्त्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार हाकणाऱ्या तत्कालिन अधिकाऱ्यांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून चूकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर करुन त्यांना अंधारात ठेवत नियुक्त्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत असे चित्र आहे. मनसेच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांनी या एकंदर सर्व गैरप्रकारांची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेले आहेत. सदरची चौकशी प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधीत भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांनी या प्रकरणाशी संबंधीत सर्व कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन टेबल/कार्यभार सूची तात्काळ बदल करण्यात यावा ज्यामूळे पुरावे नष्ट करण्याचा किंवा कागदपत्र गहाळ करण्याचा प्रयत्न होणार नाही अशी मनसेची मागणी आहे.
सदरच्या भरती प्रक्रियेबाबत व स्थानिक उमेदवारांवर झालेल्या अन्यायाबाबत मनसे अत्यंत आक्रमक असून सफाई कागारांच्या जिल्हयातील खऱ्या वारसांना न्याय देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा हाती घेणार आहे तर वेळ प्रसंगी न्यायालयीन लढा देईल. अश्या प्रकारे जिल्हा परिषद भरतीप्रक्रीयेत जिल्हयातील ज्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे अशा जिल्हयातील नागरिकांनी मनसेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,जिल्हा सचिव बाळा पावसकर,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,तालुका सचिव राजेश टंगसाळी,रमाकांत नाईक व सुंदर गावडे आदी पदाधिकरी उपस्थित होते.