मुंबई /-
अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार असल्याची सुत्रांची माहिती असून एकनाथ खडसेंच्या पक्षांतराचे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात झळकत होते. त्यातच, सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याबद्दल मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावात म्हटले होते. यासंदर्भातील वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.
सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू आहे. गुलाबराव पाटील यांनी त्या पार्श्वभूमीवर रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह खडसेंच्या पक्षांतराचे संकेत दिले होते.
तर, आज खडसे जामनेर येथील कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाणार का नाही, याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत सस्पेन्स कायम ठेवला. फडणवीसयांच्या सोबत उपस्थित राहायचे की नाही याबाबत उत्सुकता राहू द्या, आत्ताच सगळे सांगून कसे चालेल, असे खडसेंनी म्हटल्यामुळे, आजच्या कार्यक्रमाकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी नाथाभाऊंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच, याबाबत अधिकृत घोषणा होईल.
एकनाथ खडसेंनी अनेकदा जाहीरपणे भाजपकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर, खडसेंकडून फडणवीस यांच्यावरच विधानसभेला तिकीट कापण्यात आल्याचा आरोपही लावण्यात आला. त्यातच, नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीतही खडसेंना स्थान देण्यात न आल्यामुळे खडसेंच्या संयमाचा बांध फुटला असून त्यांच्या डोक्यातील टीक टीक अखेर राष्ट्रवादीत जाऊन थांबली आहे.