मालवण /-

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्गातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटन व्यवसाय हा कोरोना महामारीने सर्वात जास्त अडचणीत आला आहे; हे आता सर्वज्ञात आहे. या पार्श्वभुमीवर भारतातील एकमेव अधिकृत घोषित पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील २५-३० वर्षात इथल्या भुमिपुत्रांनी स्वकष्टाने उभारलेल्या पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनामार्फत ठोस उपाययोजना करणे कधी नव्हे एवढे गरजेचे झाले आहे. त्या दिशेने गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांशी व त्यांच्या विविध प्रतिनिधींशी संपर्क करून व्यापारी महासंघातर्फे जिल्ह्यातील पर्यटन व्यावसाय पुन्हा उभा करण्यासाठी विविध मागण्यांचा विचार व्हावा.
सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना व्हाव्यात. यात टाळेबंदीच्या सहा महिन्यांच्या काळात प्रत्यक्ष वापरलेल्या विजेचेच पैसे प्रति युनिट दराप्रमाणे आकारुन या काळातील विज देयकात महावितरणकडून आकारण्यात आलेल्या इतर आकार, स्थिर आकार आदी अन्य सर्व रक्कमेचा भार मायबाप शासनाने सोसावा, सर्व प्रकारच्या पर्यटन व्यावसायिकांच्या बँका, वित्तीय संस्था, पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्याबरोबरच ‘३१डिसेंबर २०१९ ही पायाभूत तारीख धरून’ नियमीत कर्जदारांच्या माहे एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० पर्यंतच्या कर्जावरील संपुर्ण व्याज माफ करावे, अशा पुनर्गठना सोबतच ‘केंद्र सरकारने जाहिर केल्याप्रमाणे’ पर्यटन व्यावसायिकांना येत्या दिवाळी मोसमा पुर्वीच त्यांच्या मुळ कर्जाच्या २० % रकमेपर्यंत अतिरिक्त पतपुरवठा करण्याच्या अधिकृत सुचना महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यामार्फत राज्य व जिल्हा सहकारी बँका व पतसंस्थाना तातडीने निर्गमित कराव्यात, नागरीकांना पर्यटनास प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून ‘इंग्लंडच्या सरकारने हाॅटेल, रेस्टाॅरंट खर्चावर लागू केलेल्या अनुदान योजने प्रमाणेच’ थेट ‘पर्यटन प्रोत्साहन’ अनुदान योजना ‘निवास, भोजन व जलक्रीडा अशा’ सर्व प्रकारच्या पर्यटन खर्चावर तत्काळ सुरू करावी, चिपी विमानतळासह कोकण रेल्वे मार्गावरील सर्व प्रवासी गाड्या पुर्ण क्षमतेने सुरू कराव्यात, कोकण रेल्वे मार्गावर ‘मालवाहतूकीसाठी सुरू असलेल्या रो-रो सेवेच्याच धर्तीवर’ प्रवासी रो-रो सेवा सुरू करावी, कोल्हापुरहून सिंधुदुर्गात येणारे सर्व मार्ग युद्धपातळीवर वाहतूक योग्य करावे. त्याच बरोबर पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या सर्व जिल्हातंर्गत मार्गांची तातडीने दुरूस्ती करावी, इंटरनेट सेवा व विज पुरवठा विना व्यत्यय सुरळीत रहाण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने अन्य राज्यात प्रमाणेच देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी व्यापक आणि परीणामकारक अशी जाहिरात मोहिम प्रभावीपणे प्रसारीत करावी, दसऱ्या नंतर लगेचच पर्यटन महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या सर्व संघटना व संस्था यांच्या समन्वयाने आभासी मंचावर एकदिवसीय पर्यटन महोत्सव आयोजित करावा आणि या महोत्सवात महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आभासी माध्यमांद्वारे येथील पर्यटन व्यावसायिकांशी थेट संवाद साधावा.
याचबरोबर सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाच्या उभारीसाठी तातडीने करावयाच्या दीर्घकालीन उपाययोजनामध्ये पर्यटनाशी थेट संबंधीत असलेल्या सर्व नोंदणीकृत व्यावसायिकांना सन २०२०-२१ व सन २०२१-२२ अशी सलग किमान दोन वर्षे वसेकर (जिएसटी) अंतर्गत आवश्यक सर्व प्रकारचे परतावे (रिटर्न्स) भरण्यास एक तर माफी द्यावी किंवा अशा सर्व पर्यटन व्यावसायिकांचा वसेकरांतर्गत नोंदणीकृत दर्जा दोन आर्थिक वर्षांसाठी स्थगित ठेवावा, पर्यटन व्यवसायाला उद्योगाचा दर्जा द्यावा, पर्यटन विभाग, पर्यटन महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधींची मिळून जिल्हास्तरीय पर्यटन विकास संयोजन समिती कायमस्वरूपी वैधानिकरीत्या निर्माण करावी, सर्व प्रकारच्या पर्यटन व्यवसायांसाठी आदर्श नियमावली, दर्जा व मोसम आधारीत कमाल व किमान दर निश्चिती लागू करावी, जलक्रीडा व साहसी जलक्रीडांचे परवाने अधिकृत एक खिडकी पद्धतीने एका निश्चित खात्यामार्फत देण्याची व्यवस्था करावी आणि तालुकानिहाय दिवस निश्चित करून अशी एक खिडकी आठही तालुक्यात आठवड्यातून किमान एक दिवस कार्यान्वित ठेवावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार करून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय पुन्हा फोफावण्यास सहकार्य करावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page