सांगली /-

उमराणी (ता. जत) येथील उसाच्या शेतातील गांजाची झाडे उद्ध्वस्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी 17 लाखांचा तब्बल 147 किलो वजनाचा हिरवा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मल्लाप्पा इरगोंडा बिराजदार (वय 65, रा. उमराणी) याला अटक करण्यात आली आहे. दैनिक ‘पुढारी’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.
जत तालुक्यातील उमराणी कर्नाटकच्या सीमेजवळ वसले आहे. गेल्या आठवड्यात दैनिक ‘पुढारी’ने जत येथील सीमा भागात गांजाची लागवड केली जात असल्याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त अधीक्षक मनीषा दुबुले यांनी गांजाची लागवड, तस्करी, विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार जत तालुक्यातील उमराणी या सीमावर्ती भागातील गावात उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मंगळवारी सकाळीच पथकाने उमराणी येथे छापा टाकला. त्यावेळी अडीच एकरातील उसाच्या शेतात बिराजदार याने गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्या शेतातील सर्व झाडे काढण्यास सुरूवात केली. तब्बाल पाच तास पोलिसांचे पथक शेतातील गांजाची झाडे काढत होते.
झाडे काढल्यानंतर पंचांसमोर त्याचे वजन करण्यात आले. त्यावेळी त्याचे वजन तब्बल 147 किलो भरले. बाजारभावानुसार ओल्या गांजाची किंमत 17 लाख रूपये असल्याचे निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले. याप्रकरणी बिराजदार याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान संशयित बिराजदार याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याने गांजाच्या बिया कोठून आणल्या तसेच त्याची विक्री तो कोणाला करत होता याची चौकशी सुरू असून गांजा लागवड आणि तस्करीचे संपूर्ण रॅकेट उध्वस्त करणार असल्याचेही निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले.
निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत सावंत, अच्युत सूर्यवंशी, राजू शिरोलकर, जितेंद्र जाधव, महादेव धुमाळ, मुदस्सर पाथरवट आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page