चौके /-
मालवण तालुक्यातील काळसे भंडारवाडी येथील युवक भूषण हनुमंत परब ( वय – २८ ) हा रविवार दि. ०४ ऑक्टोबर पासून घरातून बेपत्ता असलेला तरुण सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी काळसे गावानजीक वाहणाऱ्या कर्ली नदीमध्ये काळसे बागवाडी जेटी नजीकच्या गणपती साना परिसरात नदीच्या पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आईवडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की काळसे भंडारवाडी येथील मोलमजुरी आणि माडाच्या झाडांवर चढून नारळ काढण्याची कामे करणारा अविवाहित तरुण भूषण हनुमंत परब हा आपल्या आई वडिलांसोबत येथे राहत होता. दरम्यान रविवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता त्याची आई त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेली असता भूषण त्याच्या खोलीत आढळून आला नाही. त्यावर तो सकाळीच उठून नेहमीप्रमाणे कुणाच्यातरी मजुरीच्या कामास गेला असे घरच्यांना वाटले त्यामुळे त्यावेळी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु दुपारनंतरही भूषण घरी न परतल्याने घरच्यांची चिंता वाढली आणि मग शेजारील तरुणांनी त्याला शोधण्यास सुरुवात केली. तसेच पोलीस पाटील विनायक प्रभु यांच्याशी संपर्क साधून भूषण बेपत्ता असल्याची खबर कट्टा पोलिस स्थानकात देण्यात आली.
बेपत्ता भूषणची शोधाशोध सुरू असतानाच आज सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी गावातील काही तरुणांना काळसे गावाशेजारुन वाहणाऱ्या कर्ली खाडीपात्रात काळसे बागवाडी गणपती जेटी येथील गणपती साना नजीकच्या नदिपात्रात भूषणचा मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची खबर पोलीस पाटील आणि पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर मालवण पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण, कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रुक्मांगद मुंडे, पोलीस नाइक वाय. डब्ल्यू सराफदार , कॉन्स्टेबल एस. बी. पुटवाड , आणि काळसे पोलीस पाटील विनायक प्रभु यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली आणि गावातील तरुण बाळू खोत, मंगेश हळवी, संदीप नार्वेकर बाळु आचरेकर, बाळा कोळगे, अजित परब , चिंतामणी प्रभु आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने भूषणचा मृतदेह नदिपात्रातून बाहेर काढला व घटनेचा पंचनामा केला. आणि भूषणचे वडील श्री. हनुमंत परब यांना घटनास्थळी आणून मृतदेहाची ओळख पटवून खात्री करण्यात आली. यावेळी माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब, सरपंच केशव सावंत, उपसरपंच उल्हास नार्वेकर , अण्णा गुराम, राजू परब आणि ग्रामस्थ उपस्थित होते. चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी आणि कर्मचारी एन. डी. चव्हाण यांनी शवविच्छेदन करून भूषण चा मृतदेह नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या ताब्यात दिला.
दरम्यान भूषण याला नदिपात्रात गळ टाकून मासे पकडण्याची आवड होती. त्या दरम्यान अपघाताने तोल जाऊन तो नदित पडला असावा आणि त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज घटनास्थळी उपस्थित काही शेजारी व ग्रामस्थांनी व्यक्त केला. तरीही
सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण, कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रुक्मांगद मुंडे यांची टीम याबाबत अधिक तपास करीत आहे.