वेंगुर्ला /-
तालुक्यातील केळुस दडोबा देवस्थान तळीवाडी येथे अतिपर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यावरील मोरी खचून गेली आहे.परीणामी या भागातील एसटी बस सेवा बंद आहे, त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना प्रवासाची समस्या उद्भवलेली आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी बांधकाम खात्याच्या इंजिनियर समवेत पाहणी करून सदर पूल आर. सी. सी बांधकाम आणि तसेच शेती भागातील नुकसान होऊ नये यासाठी पुलाच्या दुसऱ्या बाजूला दोन्ही बाजूने वॉलकंपाऊंड बांधण्यात यावे. या दृष्टीने अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे केळुस-कालवीबंदर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दाडोबा देवस्थान तळीवाडी भागातील पावसाळी पाणी पाण्यासाठी बांधण्यात आलेली मोरी (छोटे पुल) अतिवृष्टीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे खचून गेली. त्यामुळे गावातील विविध स्वरूपाच्या वाहनांना तसेच पादचारी नागरीकास येण्या जाण्याची समस्या निर्माण झाली होती. या गावात कुडाळ डेपोतून व वेंगुर्ले डेपोतून प्रत्येकी दोन बसगाड्या कालवीबंदर भागात येत होत्या.मात्र मोरी खचल्याने एप्रिल महिन्यापासून त्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. याबाबत केळुस गावचे उपसरपंच आबा खवणेकर यांनी जि. प. अध्यक्षा समिधा नाईक व जि. प. बांधकाम खात्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. जि. प. अध्यक्षा समिधा नाईक यांनी या भागातील जि. प. बांधकाम विभागातील उप अभियंता व शाखा अभियंता यांचे समवेत पाहाणी केली. त्यावेळी ही मोरी आर. सी. सी. बांधकाम करून पुलाची (मोरीची) उंची वाढविण्याबरोबरच तेवढ्या भागातील रस्त्याची उंची वाढविण्याची तसेच दुसऱ्या बाजूस शेती-बागायती असल्याने त्याबाजुला दुतर्फा संरक्षक भिंत घालावी.अशी उपसरपंच आबा खवणेकर यांचेसह ग्रामस्थांनी मागणी केली त्यानुसार जि.प.अध्यक्षा समिधा नाईक यांनी जि.प.च्या बांधकाम खात्याचे प्रभारी उप अभियंता गणेश ठाणेश्वर यांना ग्रामस्थांच्या मागणीनुसार अंदाजपत्रक बनविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता गणेश महाडेश्वर, शाखा अभियंता सुहास टेमकर, प्रितम पवार यांनी या खचलेल्या पुलाची (मोरीची) पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक विवेक वजराटकर, सरपंच किशोर केळुसकर, उपसरपंच आबा खवणेकर, सदस्य मयुर वराडकर, सुमन पराडकर ग्रामस्थ गुरुनाथ मुणनकर,आनंद केळूसकर, अंकुश कुडव, वासुदेव बोवलेकर, कृष्णा केळुसकर, बाबू केळुसकर, गोपाळ वेंगुर्लेकर, ललित नागवेकर, पांडुरंग शिवलकर, उदय उर्फ दत्ताराम बोवलेकर, तुकाराम केळुसकर, मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन गोविंद केळुसकर आदी उपस्थित होते.